राज्यातील तब्बल 6 लाख ऊसतोड कामगारांना विमा मिळणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील तब्बल 6 लाख ऊसतोड कामगारांना विमा कवच देण्याचे प्रयत्न आहेत. हंगाम संपताना कोरोना आजाराचा प्रादुर्भाव निर्माण झाला. त्यामुळे गावी परतणार्‍या कामगारांची अडचण झाली होती. लस येण्यास उशीर लागणार असल्याने येत्या हंगामात कामगारांना संरक्षण मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होणे शक्य नसल्याने विमा कवच देण्याची योजना हाती घेतली जात आहे.

राज्यात 100 सहकारी तर 87 खासगी कारखाने असून 6 लाख ऊसतोड कामगार काम करतात. नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम चालतो. सध्या कोरोना महामारीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा साखर कारखान्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना विमा कवच देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांसोबत प्राथमिक बोलणी झाली आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून सरकार व सहकारी कारखाने दोघे मिळून कामगारांचा विमा भरण्याचे नियोजन आहे. एका कामगाराला साधारणत: 700 ते 1000 रुपये विमा रक्कम येणार आहे. त्यातून कामगारांवर करोनामुळे दुर्दैवी प्रकार ओढवल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 10 ते 15 लाख रुपये मिळाले पाहिजे असे प्रयत्न आहेत.