‘प्लाझ्मा’ थेरिपीची लस बनवतेय भारतीय कंपनी, लवकरच होणार मानवी चाचणी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये भारतही आघाडीवर आहे. पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे.

विविध देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीवरही संशोधन सुरू आहे. काही देशांनी लस तयार केल्याचाही दावा केला आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीदेखील उपयोगी ठरत आहे. याचदरम्यान देशातील फार्मा कंपनी इंटास फार्माने प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केले आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात अशाप्रकारची पहिली लस विकसित करण्याचे काम सुरू आहे. ही लस पूर्णत: स्वदेशी आहे. हायपरिम्युन ग्लोब्युलिनला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड 19 वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल, अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली आहे.