‘हिंदुत्वा’मुळे राज ठाकरेंबद्दल ‘इंटरेस्ट’ वाढला, फडणवीसांनी सांगितली ‘राज की बात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढला असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतीत प्रश्न विचारण्यात आले. शिवसेनेसोबतची युती तुटल्यानतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यामध्ये बदल केला. तर या भेटीमागे काय रहस्य होते ? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांना आपण जवळून ओळखता. कुणाच्या म्हणण्याने ते काही करतील असे नाही.

राज ठाकरे यांना त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कुठे पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कशी भरून काढायची हे समजते. ते कुणाच्या सांगण्यावरून काहीही करतील असे वाटत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच शिवसेना मोठी कधी झाली ? शिवसेनेने मराठी माणसासोबत हिंदुत्त्वाची कास धरली तेव्हा राष्ट्रीय पक्ष झाला. त्यानंतर राज ठाकरेंच्याही लक्षात आले की मराठी माणूस हा केंद्रबिंदू असलाच पाहिजे, पण त्याला व्यापकता दिली नाही तर आपली भूमिका मर्यादित राहते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले राज ठाकरे हे माझे मित्र आहेत, मीडियात न समजता आम्ही अनेकवेळा बोललो आहे, भेटलो आहे.

मी मुख्यमंत्री असतानाही त्यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत गप्पा मारताना मजा येते. त्यांच्याकडे वेगळी माहिती, वेगळे नॉलेज असते. मी त्यांच्यावर खूप टीका केली, त्यांनी माझ्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्याकडे एक वेगळा विचार आहे. त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याच वेगळी पद्धत आहे. माझ्या भेटण्याने ते हिदुत्तवाकडे आले नाहीत ते हिंदुत्वाकडे येत आहेत हे समजल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून समजून घेतले की नेमके त्यांच्या मनात काय आहे. त्यांचा ट्रॅक करेक्ट होता, ते योग्य दिशेने होते, असे फडणवीस यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या हिंदुत्त्वाकडे जाण्याने माझा त्यांच्या बद्दलचा इंटरेस्ट वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.