दिल्ली गमावल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उघड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह उघड होत आहे. देशात आणि दिल्लीत दिर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला दिल्लीत खातेही उघडता आले नाही. या कारणामुळे आता काँग्रेसमधील नेतेमंडळी पक्षाच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित करुन पराभवाचे खापर एकमेकांच्या माथी मारून मोकळे होत आहेत. या नेत्यापैकी एक असलेले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला रणनीती बदलण्याचा सल्ला दिला आहे.

सिंधिया यांच्या सल्ल्यानंतर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी दिल्ली निवडणुकीत काँग्रेसचे प्रभारी असलेले पी. सी. चाको यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग दुसऱ्यावेळी भोपळा ही फोडता आला नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह उघड झाला आहे. काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षानंतर आता केंद्रीय नेतृत्वावर देखील निशाणा साधला जात आहे.

काँग्रेसला नवा विचार स्विकारण्याची आवश्यकता असून नव्या रणनीतीवर काम करण्याची आवश्यकता आहे. असे मत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले आहे. तर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी देखील पी. सी. चाको यांच्यावर निशाणा साधत त्यांना सुनावले आहे. याच बरोबर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.पक्षाला मोठे बदल करावे लागतील अन्यथा पक्ष कालबाह्य होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या दिल्ली पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा आणि त्यानंतर प्रभारी पी. सी. चाको यांनी आपले राजीनामे दिले आहेत. राजीनामा देताना चोका यांनी दिल्लीच्या पराभवाला माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दिक्षित जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शीला दिक्षित मुख्यमंत्री असताना 2013 मध्ये पक्षाची पडझड होण्यास सुरुवात झाल्याचा आरोप चाको यांनी केला आहे.