भारताविरूध्द नेपाळला भडकवून आपल्या बाजूनं करण्याचा चीनचा डाव, ‘ड्रॅगन’ हुशारी करून चालतोय ‘चाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : नेपाळने आपला नवीन राजकीय नकाशा प्रसिद्ध करत गेल्या अनेक वर्षांपासून भारताशी असणारे चांगले संबंध बिघडवण्याचे काम केले आहे. या नकाशात नेपाळने लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख हे नेपाळचे भाग असल्याचे वर्णन केले आहे. हे सरकारकडून जारी करण्यात आल्यामुळे बर्‍याच प्रश्नांना उधाण आले आहे. नेपाळने अशी कारवाई का केली हा यातला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामागे चीनचे काही षडयंत्र आहे का? तज्ञांच्या मते, यामागे कुठे ना कुठे चीनचाच हात असू शकतो, जो नेपाळकडून हे सर्व करून घेत असेल.

नेपाळकडून हा नकाशा भारताच्या त्या निर्णयाच्या दहा दिवसांनंतर समोर आला आहे जेव्हा भारताने लिपुलेख मध्ये रस्ता तयार केला होता. हाच मार्ग तिबेटमार्गे मानसरोवरला जातो. नेपाळकडूनही या रस्त्याला विरोध करण्यात आला होता. नेपाळचा विरोध लक्षात घेता दोन्ही देशांनी परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा करण्याचे मान्य केले आहे. किंग्‍स कॉलेजचे प्रोफेसर हर्ष व्ही पंत यांच्या मते नेपाळला आत्मविश्वास द्यावा लागेल की आम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहोत. विशेष म्हणजे कालापानी नदीकाठचा परिसर हा नेहमीच भारताकडे राहिला आहे.

नेपाळच्या या निर्णयामागे चीनचा हात असल्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चीन गेल्या काही काळापासून नेपाळला आपल्या तावडीत धरण्याचा प्रयत्न करीत आहे. नेपाळला भारताविरुद्ध चिथावून त्यास आपल्या बाजूने करण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. याची सुरुवात 2016-17 मध्येच झाली होती जेव्हा नेपाळमध्ये प्रचंड सरकार स्थापन झाले होते. प्रचंड सरकार चीन समर्थक होते. तेव्हापासून नेपाळचा कल चीनकडे वळला होता. यानंतर नेपाळवरची पकड आणखी घट्ट करण्यासाठी चीनने नेपाळला आर्थिक मदतही केली.

चीनने यापूर्वीच भारतातील अक्साई चिनवर बेकायदेशीरपणे ताबा घेतला आहे. याव्यतिरिक्त हिमाचल आणि उत्तराखंडच्या काही भागांवर चीन ठामपणे आपला हक्क सांगत आहे. त्याचबरोबर ते अरुणाचल प्रदेशातही आपला भाग असल्याचा दावा करत आहेत. एवढेच नव्हे तर चीनने येथे होत असलेल्या बांधकामांवरही आक्षेप नोंदविला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तराखंड सीमेवरही चिनी सैनिकांनी भारतीय सैन्याशी दोनहात केले होते. भारतासमवेत डोकलाम बाबतही परिस्थिती चिघळली आहे. तेथे चीनवर भारताने जोरदार मात केली. यानंतर चीन नेपाळला आपल्या जाळ्यात अडकवून भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे.