International Flights : DGCA चे निर्देश, 31 डिसेंबरपर्यंत जारी राहणार आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रतिबंध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीमुळे नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) भारतात शेड्यूल आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांच्या वाहतुकीवर प्रतिबंध 31 डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. परंतु, यादरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत करण्यात येणारी उड्डाणे सुरू राहतील. यापूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंध होता. डीजीसीएच्या आदेशानुसार, केवळ निवडक उड्डाणांनाच संचालनाची परवानगी असेल.

भारताने कोरोना व्हायरस महामारीमुळे दोन महिन्यांच्या अंतरानंतर 25 मे रोजी स्थानिक प्रवासी उड्डाणे पुन्हा सुरू केली होती. यानंतर परदेशात अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन चालवण्यात आले आणि अनेक देशांसोबत एअर बबल करारसुद्धा करण्यात आला. भारतीय एअरलाईन्सला अगोदर कोविड 19 स्थानिक उड्डाणांचे कमाल 60 टक्के संचालन करण्याची परवानगी आहे. देशात वंदे भारत मिशनची सुरुवात केल्यापासून 29 ऑक्टोबरपर्यंत 27 लाखांपेक्षा जास्त भारतीय दुसर्‍या देशातून परत आले.

डीजीसीएने परिपत्रात म्हटले की, दिनांक 26-6-2020 च्या परिपत्रात अंशत: दुरुस्तीअंतर्गत सक्षम प्राधिकार्‍याने भारतातून/भारतासाठी अनुसूचित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवांच्या निलंबनासंबंधी जारी परिपत्राची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे.

महामारीचे संकट पुन्हा वाढले
भारतात कोरोना महामारीचे संकट अजूनही सुरूच आहे. एका दिवसात कोविड 19 ची 44,489 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर देशात संसर्गाची प्रकरणे वाढून 92.66 लाख झाली आहेत, ज्यापैकी 86.79 लाख लोक संसर्गमुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी आठ वाजता जारी केलेल्या आकड्यांनुसार देशात आतापर्यंत कोविड 19 ची 92,66,705 प्रकरणे समोर आली आहेत, तर आणखी 524 लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची एकूण संख्या वाढून 1,35,223 झाली आहे.

You might also like