आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश : नेपाळी गँगकडून 2 कोटी 80 लाखांचे चरस हस्तगत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बोरिवली येथील नॅशनल पार्कजवळ आलेल्या एका नेपाळी गॅगच्या सदस्याकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांचा १४ किलो ५६ ग्रॅम चरस जप्त केला आहे. प्रबेज महामजान अन्सारी (वय २३, रा. जोतपूर, पो. फेटा, ता. कलेया, जि. बारा, नेपाळ) असे या नेपाळी गँगच्या सदस्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटला एक नेपाळी गँगचा सदस्य नेपाळहून मुंबईत चरसची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश तावरे व त्यांच्या पथकाने बोरिवली पूर्व येथील नॅशनल पार्कजवळ सापळा लावला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार काही वेळानंतर एक जण तेथे आला. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केल्यावर त्यात १४ किलो ५६ ग्रॅम चरस आढळून आला. अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईत प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे यापूर्वी आढळून आले होते. मात्र, आता थेट नेपाळमधून सीमा ओलांडून अंमली पदार्थ इतक्या मोठ्या प्रमाणावर मुंबईत येत असल्याचे आढळून आले आहे.