चिंताजनक ! अमेरिकेसह युरोपमध्ये फोफावतोय आणखी एक ‘गंभीर’ आजार !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील संशोधक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र या दरम्यानच आता अजून एका नवीन आजाराचा संसर्ग पसरत आहे. या आजाराने अमेरिका आणि युरोपमधील काही देशांमध्ये हजेरी लावली आहे. या आजाराला पीडिएट्रिक मल्टी-सिस्टीम इनफ्लेमेट्री सिंड्रोम असे नाव देण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये या आजाराने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता या आजाराचा आणि करोनाचा काही संबंध आहे का हे शोधले जात आहे.

या आजारानं ब्रिटनमध्ये कहर केला असून आतापर्यंत जवळपास ६४ अल्पवयीन मुले आणि युवक याच्या विळख्यात सापडले आहेत. या आजाराची लक्षणं म्हणजे ताप येणे, पोटात दुखणे आणि सारख्या उलट्या होणे ही आहेत. हार्वर्ज मेडिकल स्कूलमधील प्रा. जेन न्यूबर्गर म्हणाले की, अजून तरी या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी आहे परंतु या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. दरम्यान या आजाराबाबत डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केले आहे.

या आजाराने ग्रस्त काही रुग्णांमध्ये टॉक्सिक शॉक सिंड्रोम सारखी लक्षणे दिसून येत आहेत. तसेच छातीत प्रचंड जळजळ होण्याचा प्रकार देखील समोर येत आहे. याव्यतिरिक्त पोटदुखी, अतिसार आणि उलटीचा त्रास देखील होत आहे. दरम्यान रुग्णांना इमुनोग्लोबिन देण्यात येत आहे जेणेकरून छातीत होणारी जळजळ कमी होईल. त्याशिवाय स्टेरॉइड आणि साइटोकाइन ब्लॉकर्सही देण्यात येत आहे.

युरोपमध्ये या आजाराने धुमाकूळ घातला असून अनेक मुलं याच्यावर मात करतील असा विश्वास बालरोग तज्ञ डॉ. सीन ओ लीरी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या आजारामुळं एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच या आजाराचे इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्ये देखील रुग्ण सापडले आहेत.