Corona : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगवरील टीका भोवली ? अब्जाधीशाला 18 वर्षाचा तुरुंगवास

बिजिग : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाच्या मुद्यावर चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांच्यावर टीका करणे एका अब्जाधिश उद्योगपतीला चांगलेच महागात पडल्याची चर्चा आहे. एका सरकारी रिअल इस्टेट कंपनीच्या माजी अध्यक्ष आणि उद्योजक रेन झिकियांग यांना 18 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते.

रेन झिकियांग यांनी कोट्यावधी डॉलरची रक्कम लाच म्हणून स्विकारली असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. रेन यांना बीजिंगमधील कोर्टाने 18 वर्षाच्या तुरुंगवासासह 6 लाख 20 हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. रेन यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. रेन यांच्याजवळ बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती.

अमेरिकन वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले जाते. तसेच प्रसारमाध्यमांवरही नियंत्रण ठेवण्यात आले असून अन्य संवेदनशील विषयांवर परखड मत मांडणारा रेन यांचा एक लेख ऑनलाइन प्रकाशित झाला होता. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ते सार्वजनिकरित्या दिसले नाहीत.या लेखामध्ये त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर टीका केली होती. डिसेंबरमध्ये सुरु झालेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यात त्यांना अपयश आल्याची टीका रेन यांनी केली होती.

रेन यांच्यावर भ्रष्टाचार, लाच घेणे आणि शासकीय कंपनीत आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवला होता. रेन यांची यापूर्वीच कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. शी जिनपिंग यांनी आपल्या विरोधकांवर वचक ठेवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि तर तुरुंगात आहेत.