Coronavirus : ‘कोरोना’च्या भीतीपोटी अमेरिकेत शस्त्र खरेदीसाठी नागरिकांची ‘झुंबड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे अमेरिकेत कोरोनाचे संकट मोठया प्रमाणावर असून दुसरीकडे मागच्या दोन आठवड्यात बंदुकांची खरेदीही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले आहे. या साथीच्या रोगामुळे बेरोजगारी, लूटमार आणि सामाजिक उठाव होण्याच्या भीतीने अनेकजण बंदुका आणि दारूगोळ्याचा साठा करून ठेवत आहेत.

ओक्लाहोमा प्रांतातील टलसा येथील डाँग्ज गन्स अमो अँड रिलोडिंग या शस्त्रांच्या दुकानाचे मालक डेव्हिड स्टोन यांच्या माहितीनुसार त्यांच्या विक्रीत तब्बल ८०० टक्के वाढ झाली असून साठा संपत आला असल्याचे त्यांनी सांगितले. तर खरेदी करणारे ग्राहक नवीन असून ते भेटेल ते शस्त्र खरेदी करत आहेत. तसेच कोरोना व्हायरसचा हा परिणाम आहे, यामागचे नेमके कारण मला समजलेले नाही. पण ही कृती अतार्किक असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील काही विक्रेते त्यांचे निरीक्षण सांगताना म्हणाले की, साथीच्या रोगामुळे आरोग्यसंकट किंवा आर्थिक संकट निर्माण झाले, तर समाजव्यवस्था धोक्यात येईल, या भीतीनेच अनेकजण शस्त्रांची खरेदी करून ठेवत आहेत. तसेच कोणी तरी आपल्या घरात घुसून लूटमार करेल, पैसे, अन्न, टॉयलेट पेपर चोरून नेईल, याही भीतीने ही कृती होत असेल, असे त्यांनी सांगितले.

तर उता येथील डेल्टा टीम टॅक्टिकल या कंपनीचे मार्केटिंग संचालक डॉर्डन मॅककॉर्मिक यांनी त्यांच्या कंपनीत सातत्याने उत्पादनाचे काम सुरु असून बेरोजगारीचे प्रमाण वाढले, तर लूटमार वाढेल, ही भीती यामागे आहे.

दुकानाबाहेर लागत आहेत रांगा
लोकं शस्त्र खरेदीसाठी दुकाने उघडायच्या आधीच दुकानाबाहेर रांगा लावत असल्याचे वॉशिंग्टनमधील लिनवुड गन या दुकानाच्या मालक टिफनी टिसडेल यांनी सांगितले. अगोदर दिवसाला जास्तीत जास्त २० ते २५ शस्त्रांची विक्री व्हायची. पण आता हा आकडा दीडशेवर गेला असून ग्राहकांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी बाऊन्सरची नेमणूक करावी लागते, असेही त्यांनी सांगितले.