COVID-19 : दिलासादायक ! ‘कोरोना’बाधितांसाठी हे औषध ठरणार ‘संजीवनी’, मृत्यूदरात घट

लंडन : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून लाखो लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नव्हते. मात्र, आता कोरोनाच्या आजारावर परिणामकारक ठरणाऱ्या औषधाचा शोध लागल्याचा दावा ब्रिटीश वैज्ञानिकांनी केला आहे. या औषधामुळे कोरोनाच्या आजारामुळे मृत्युशी झुंज देत असलेल्या रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेक्सामेथासोन या स्टेराईडमुळे कोरोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांच्या मृत्यू दरात एक तृतीयांश घट झाली असल्याचेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

डेक्सामेथासोनचा वापर 2104 रुग्णांवर करण्यात आला असून या रुग्णांची इतर सामान्य उपचार घेणाऱ्या 4321 रुग्णांशी तुलना करण्यात आली आहे. या औषधाच्या वापरानंतर व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यू दरात तब्बल 35 टक्के घट झाली असल्याचे समोर आले आहे. तर रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत होते त्या रुग्णांच्याही मृत्यू दरात 20 टक्के घट झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक पीटर होर्बी यांनी सांगितले की, संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष हे आशादायी आहेत. या औषधामुळे मृत्यू दर कमी करणे आणि ऑक्सिजनच्या मदतीने उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा फायदा झाला. यामुळे गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांवर डेक्सामेथासोनचा वापर करायला हवा असं त्यांनी म्हटले आहे. हे औषध महाग नसून जगभरातील कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी याचा वापर करता येणे शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे औषध कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यानी सांगितले.

WHO कडून स्वागत
जागतिक आरोग्य संघटनेने डेक्सामेथासोनच्या वापरातून यशस्वी उपचार करणाऱ्या संशोधकांचे आणि रुग्णांचे अभिनंदन करण्यात आले आहेत. या औषधाच्या वापरामुळे मृत्यू दरात घट होत असून गंभीर असलेल्या रुग्णावर यशस्वी उपचार करणे शक्य असल्याचे प्राथमिक चाचणीत आढळून आल्याचे संघटनेने म्हटले आहे.