लादेनला मारण्यासाठी वापरलेले शक्तिशाली अपाचे हेलिकॉप्टर आता भारताकडे

वाशिंगटन : वृत्तसंस्था – कुख्यात दहशतवादी आणि आल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी ज्या लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता ते शक्तिशाली हेलिकॉप्टर आता भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. युद्धभूमीवर अत्यंत उपयुक्त असणाऱ्या २२ अत्याधुनीक अपाचे विमानांचा करार भारताने अमेरिकेशी केला असून जुलै २०१९ पर्यंत सगळी विमानं वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

अपाचेसारखी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेने कधीच वापरली नव्हती. भारतीय वायुसेनेतील काही निवडक ओफिसर्स आणि जवानांनाच हे हेलिकॉप्टर्स वापरण्याचे प्रशिक्षण अमेरिकेने दिले आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते. १९७५ मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती तर १९८६ मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. अमेरिकेशिवाय नेदरलॅंड्स, इजिप्त, इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे विमानं आहेत.

म्हणून करण्यात आला अमेरिकेशी हेलिकॉप्टर करार
भारत आतापर्यंत रशियाकडून विकत घेतलेल्या मिग-३५ हेलिकॉप्टर्सचा वापर करत होता. ही हेलिकॉप्टर्स आता अत्यंत जुनी झाली असून भारताला नवीन हेलिकॉप्टर्सची गरज होती. त्यानुसार २२ अपाचे हेलिकॉप्टर्सचा करार अमेरिकेशी करण्यात आला.

काय आहेत हैलिकॉप्टरची वैशिष्टये
डोंगराळ भागात, कोणत्याही ऋतूमध्ये-पावसाळा, हिवाळा असो वा उन्हाळा ही हेलिकॉप्टर्स सहज आक्रमण करू शकतात.

५१६५ किलो वजन असलेल्या या विमानांचा ताशी वेग ३६५ किमी इतका आहे.

काही क्षणांमध्ये शत्रूचे रनगाडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये आहे.

अफगाणिस्तान आणि इराकमध्ये झालेल्या युद्धांमध्ये अमेरिकेला या हेलिकॉप्टर्सची भरपूर मदत झाली होती.