‘कोरोना’ संसर्गाचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतोय !

संयुक्त राष्ट्र : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील बहुतांश देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या घरामध्ये बंद आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना बाधितांसह इतर निरोगी नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सरकार आणि समाजाने पावले उलण्याचे आवाहन संयुक्त रष्ट्राने केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या संकटामुळे मानसिक आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारे, नागरी समाज आणि आरोग्य प्राधिकरणांनी त्वरित पावलं उचलण्याची गरज आहे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गटेरेस यांनी केले आहे. गटेरेस यांनी एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, मानसिक आरोग्य सेवांकडे गेल्या अनेक दशकांमध्ये दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे कोरोनाच्या साथीचा फटका बसलेली कुटुंबे आणि समुदाय आता मानसिक तणावाचा सामना करत आहेत.

या साथीमध्ये आपल्या प्रियजनांना गमावण्याचे दु:ख, रोजगार जाण्याचा धक्का, अलगीकरण आणि लोकांच्या वावरण्यावर आलेले निर्बंध, कुटुंबामधील वाढत्या गुंतागुंत आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता व भय ही वाढत्या मानसिक तक्रारींची कारणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, जे लोक अधिक धोकादायक स्थितीत आहेत आणि ज्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे, अशांमध्ये पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, वयस्क, तरुण, आधीपासूनच जे मानसिक तक्रारीशी सामना करीत आहे आणि या साथीने व संकटाने ग्रासले आहेत. अशांचा समावेश आहे. तसेच या परिस्थितीत मानसिक आरोग्यसेवांवर प्राधान्य असले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.