‘तानाशाह’ किम जोंगकडून अणवस्त्र निर्मितीचं समर्थन, म्हणाले – ‘यापुढेही बनवत राहणार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियाचे राष्ट्रपती सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वीच अणवस्त्र निर्मितीचे समर्थन केले असतानाच, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राद्वारे मारा करतील अशा लहान अणू बॉम्ब निर्मिती केल्याची माहिती दिली आहे. उत्तर कोरिया निर्बंधाचे उल्लंघन करत असल्याचा ठपका या समितीने लावला आहे. त्यामुळे अमेरिका, जपान, दक्षिण कोरियाच्या चिंतेत भर पडली आहे.

उत्तर कोरियावर नियुक्त असलेल्या संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेच्या समितीने सादर केल्या अहवालात सांगितलं आहे की, उत्तर कोरिया सतत आपला अणू कार्यक्रम राबवत आहे. इतर देश आपल्यावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करतील म्हणून, किम जोंग उन यांनी सहा लहान अणुबॉम्बची निर्मिती केल्याचा दावा, काही देशांनी केला आहे. यामध्ये युरेनियम आणि लाइट वोटर रिएक्टरची निर्मिती आहे. तसेच उत्तर कोरिया मल्टिपल वॉरहेड सिस्टमवर काम करत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

तसेच संयुक्त राष्ट्राच्या या अहवालात पुढं म्हटलं आहे की, जगभरात उत्तर कोरियाकडून सातत्याने सायबर हल्ले करण्यात येत असून, ऑनलाइन गुन्ह्यात उत्तर कोरियाचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच उत्तर कोरिया आपल्यावर लादलेली निर्बंध झुगारुन अणवस्त्र कार्यक्रम राबवताना दिसत आहे. जगातील अणवस्त्र कार्यक्रमांवर लक्ष ठेवत असलेल्या ‘सिप्री’ या आंतराष्ट्रीय संस्थेने सांगितल्यानुसार, उत्तर कोरियाकडे सद्य स्थितीला ३० ते ४० अणुबॉम्ब असून ते त्यांची संख्या वाढवत असल्याचे त्यांचे मत आहे.

उत्तर कोरियाची सत्तेची सूत्रे हातात आल्यापासून किम जोंग उन अणवस्त्र वाढीसाठी मोठ्या प्रमाणात जोर लावताना दिसत आहेत. कोरियन भूमीवर आता युद्ध होणार नसून राष्ट्रीय सुरक्षा भविष्याच्या दृष्टीने आपल्यासाठी अणवस्त्र ही कायम स्वरुपाची हमी असल्याचं किम यांनी कोरियन युद्ध संपत्तीच्या दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात म्हटलं आहे.