परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना उड्डाण मंत्रालयाची महत्त्वाची सूचना !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   शिक्षण काम आणि पर्यटनाच्या उद्देशानं परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आता नागरी उड्डाण मंत्रालयानं दिलासा दिला आहे. ज्यांना परदेशी प्रवास करायचा आहे त्यांना परवानगीसाठी नागरी विमान मंत्रालयाकडे अर्ज करण्याची गरज नाही. आता ते थेट विमान कंपन्यांकडून तिकीट बुक करू शकणार आहेत असं नागरी मंत्रालयानं सूचित केलं आहे.

यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसार, नागरी उड्डाण मंत्रालय किंवा मंत्रालयाद्वारे नामांकित एजन्सीत नागरिकांना आवश्यक माहिती सहित अर्ज करावा लागेल. यात प्रस्थान आणि आगमन स्थळ यांच्या माहितीचाही समावेश होता.

नागरी उड्डाण मंत्रालयानं नुकतंच स्पष्ट केलं आहे की, वंदे भारत मिशन तसंच एअर ट्राफिक बबल सिस्टीमद्वारे संचालित सर्व विमान कंपन्यांना या उद्देशानं नामांकित केलं आहे द्विपक्षीय एअर बबल व्यवस्थेद्वारे दोन्ही देशांची विमानं काही नियमांसिहत विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांना संचालित करू शकतात.

आता असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की, प्रवाशांना आपल्या प्रवासासाठी थेट एअरलाईन्सशी तिकीट बुक करण्यासाठी संपर्क करावा लागणार आहे. त्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाकडे अर्ज करण्याची गरज नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या 23 मार्च पासून निर्धारीत आंतरराष्ट्रीय उड्डाणं थाबवण्यात आली होती. या दरम्यान वंदे भारत मिशन आणि द्विपक्षीय एअर बबल व्यवस्थेद्वारे विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू आहेत. याच वर्षी जुलैपासून भारतानं आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब आमिरात तसंच कतार अशा देशांसोबत वेगवेगळ्या द्वपक्षीय एअर बबल व्यवस्थेवर करार केले आहेत.