वनविभागाच्या जागेतून गारगोटींची आंतरराष्ट्रीय तस्करी

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा तालुक्यातीव चिखली हद्दीत वनविभागाच्या जागेत उत्खनन करून गारगोटींची तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे. गारगोटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असून, चोरीस गेलेल्या गारगोटीची किंमत लाखांच्या घरात आहे.

चिखलीच्या हद्दीत वनविभागाच्या गेट क्रमांक 58 मधील जागेत गारगोटी तस्करानी जेसीबीच्या साह्याने 11 मीटर लांब, 6 मीटर रुंद व दोन मीटर खोलीचा एक मोठा खड्डा खोदला. त्याठिकाणी पांढर्‍या रंगाच्या गारगोटीचा साठा सापडला. तस्करांनी ट्रकने हा साठा चोरून नेला. याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांनी 27 डिसेंबर 2018 रोजी अनोळखी तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, 5 फेब्रुवारी 2016 रोजीही याच गटातून उत्खनन करून गारगोटी लंपास केली होती. त्यावेळीही अनोळखी तस्कराविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्याचा तपास लागला नाही. कालच्या चोरीबाबत संबंधित तस्कराविरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

वनविभागाचे हे क्षेत्र माळढोक अभयारण्यासाठी आरक्षित आहे. आरक्षित जागेत वाहन घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जवळपास दोन ट्रक पांढर्‍या रंगाची गारगोटी लांबविण्यात आली. दरम्यान, याबाबत वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मोठी गुप्तता पाळली होती. याबाबत विचारता काहीच प्रकार घडला नसल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, वनविभागाने याबाबत फिर्याद दाखल केली असली तरी त्यांचे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष संशयास्पद आहे.

तस्करीचे जालना कनेक्शन

वनविभागाच्या जागेत चोरूलेली गारगोटी जालना येथील एका ठिकाणी माहिती सूत्रांकडून मिळाली. तेथून ही तस्करी चालत असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येईल.