International Women’s Day 2020 : जाणून घ्या ‘महिला दिना’चा इतिहास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आंतरराष्ट्रीय महिला दिन जगातील प्रत्येक महिलेच्या सन्मानार्थ ८ मार्च रोजी साजरा केला जातो. परंतु महिला दिन साजरा करण्याचा इतिहास प्रत्येकाला माहितच असेल असे नाही. तर जाणून घेऊया महिला दिनाचा इतिहास…

८ मार्च रोजी साजरा होणार्‍या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिला हा दिवस साजरा करण्यासाठी देश, जात, भाषा, राजकीय आणि सांस्कृतिक भेदभाव बाजूला सारून एकत्र येतात. तसेच, पुरुष वर्ग देखील महिलांच्या सन्मानार्थ हा दिवस समर्पित करतात.

खरं तर, इतिहासानुसार समान अधिकारांची ही लढाई सामान्य महिलांनी सुरू केली होती. प्राचीन ग्रीसमध्ये, लीसिसट्राटा नावाच्या एका महिलेने फ्रेंच क्रांतीच्या दरम्यान युद्ध समाप्तीची मागणी करत या चळवळीची सुरुवात केली, पर्शियन महिलांच्या एका गटाने या दिवशी वर्साइल्स मध्ये एक मोर्चा काढला, या मोर्चाचा उद्देश युद्धामुळे स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवण्यात यावा असा होता.

सन १९०९ मध्ये अमेरिकन सोशलिस्ट पार्टीने २८ फेब्रुवारी रोजी प्रथमच महिला दिन साजरा केला. १९१० मध्ये सोशलिस्ट इंटरनॅशनल द्वारा कोपनहेगन येथे महिला दिनाची स्थापना केली गेली होती आणि १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधील लाखो महिलांनी मोर्चा काढला होता. मताधिकार, शासकीय कार्यकारिणीतील जागा, नोकरीतील भेदभाव दूर करणे अशा विविध विषयांच्या मागणीसाठी याचे आयोजन करण्यात आले होते. १९१३-१४ च्या पहिल्या महायुद्धात रशियन महिलांनी प्रथमच शांतता प्रस्थापित करण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी महिला दिन साजरा केला.

युरोपात देखील युद्धाच्या विरोधात निदर्शने झाली. १९१७ पर्यंत विश्व युद्धात २ लाखापेक्षा अधिक रशियन सैनिक मारले गेले, रशियन स्त्रिया पुन्हा भाकरी आणि शांततेसाठी संपावर गेल्या. जरी राजकारणी या चळवळीच्या विरोधात होते, परंतु स्त्रियांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि आपली चळवळ पुढे चालू ठेवली आणि शेवटी फलस्वरूप सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार जाहीर करावाच लागला.

महिला दिन आता जवळजवळ सर्व विकसित, विकसनशील देशांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस महिलांना त्यांची क्षमता, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रगती देण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचे हक्क मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या महिलांची आठवण ठेवण्याचा आहे.

महिला दिन भारतात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील महिलांचा समाजातील विशेष योगदानाबद्दल गौरव केला जातो आणि समारंभांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांकडून जसे की अवेक, सेवा, अस्मिता, स्त्रीजन्म, विविध ठिकाणी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येतात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. समाज, राजकारण, संगीत, चित्रपट, साहित्य, शिक्षण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिलांना पुरस्कृत केले जाते. बर्‍याच संस्था गरीब महिलांना आर्थिक मदत देखील प्रदान करतात.

भारतात महिलांना शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा हक्क आणि मूलभूत हक्क प्राप्त आहेत. परिस्थिती हळूहळू बदलत आहे. भारतात आज महिला सैन्य, हवाई दल, पोलिस, आयटी, अभियांत्रिकी, चिकित्सा क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालू लागल्या आहेत. आता मुला-मुलींमध्ये कोणताही फरक पालक करताना दिसत नाहीत. परंतु ही विचारधारा समाजातील काही वर्गापुरतीच मर्यादित आहे.

खऱ्या अर्थाने महिला दिवसाचा उद्देश तेव्हाच सार्थ होईल जेव्हा जगभरातील महिलांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संपूर्ण स्वातंत्र्य मिळेल, कोणीही त्यांच्यावर अत्याचार करणार नाही, त्यांना हुंड्याच्या लालसेखाली जिवंत जाळले जाणार नाही, स्त्री भ्रूणहत्या केली जाणार नाही, त्यांच्यावर बलात्कार केला जाणार नाही, त्यांची विक्री केली जाणार नाही. त्यांचा दृष्टीकोन समाजाच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये महत्त्वाचा मानला जाईल. याचा अर्थ असा की त्यांनादेखील पुरुषांप्रमाणे माणूस म्हटले जाईल. जेव्हा त्या ताठ मानेने स्त्री असल्याचा अभिमान बाळगतील, महिला असण्याचा जेव्हा त्यांना पश्चात्ताप होणार नाही.