International Women’s Day 2020 : देशातील अशा ‘प्रतिभा’वान महिला ज्यांच्या जीवनातून आयुष्यातून तुम्हाला मिळेल ‘प्रेरणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज महिला आपल्या घराची, कुटूंबाची जबाबदारी उत्तमपणे पार पाडतात. काही महिला तर अशा आहेत ज्यांनी त्यांचे करिअर म्हणूनच काम निवडले आणि अनेक अडचणींचा सामना करत समाजासमोर आदर्श ठेवला. एवढेच नाही तर राजकारणात देखील त्यांचा दबदबा कायम राहिला. या महिलांनी आपल्या नेतृत्व क्षमतेने सर्वांना चकीत केले. मग त्या पहिल्या महिला पंतप्रधान इंंदिरा गांधी असतील किंवा पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील असतील. या सर्व महिलांच्या जीवनातून आपल्या सर्वांना काही ना काही प्रेरणा तर मिळतेच.

दिपक संधू –
दिपक संधू भारताच्या पहिल्या महिला मुख्य सूचना आयुक्त होत्या. 5 सप्टेंबर 2013 साली पदावर नियुक्त झालेल्या दिपक डिसेंबरमध्ये या पदावरुन सेवानिवृत्त झाल्या. याशिवाय त्यांच्या नेतृत्व क्षमतेचे देखील कौतूक झाले. त्यांनी भारतीय सूचना सेवेत महत्वपूर्ण पदांवर काम केले. पीआयबीच्या प्रधान महानिदेशक, मीडिया आणि संचार, डीडी न्यूजचे महानिदेशक अशी विविध पद त्यांनी भूषवली. यासह त्यांनी कान, बर्लिन, वेनिस आणि टोकीयोमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये देखील सहभाग घेतला.

व्ही. एस. रमा देवी –
कर्नाटकच्या राज्यपाल म्हणून काम पाहिलेल्या रमा देवी भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत. महिला म्हणून ही त्यांच्यासाठी गौरवाची बाब होती. व्ही एस रमा देवी यांनी 26 नोव्हेंबरपासून 11 डिसेंबर 1990 पर्यंत पदभार स्वीकारला होता.

मीरा कुमार –
31 मार्च 1945 ला जन्मलेल्या मीरा कुमार दलित समुदायातील होत्या. त्या माजी उप पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांची मुलगी आहेत. त्यांच्या आई इंद्राणी देवी एक समाजसेविका होत्या. 1985 साली त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यांनी बिजनोरमधून निवडणूक लढली होती. 2009 मध्ये मीरा कुमार यांना लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती बनण्याचा मान मिळाला.

प्रतिभा पाटील –
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील आहेत. प्रतिभा पाटील यांचे संपूर्ण नाव प्रतिभा देवी सिंह पाटील आहे. प्रतिभा पाटील यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 ला महाराष्ट्राच्या जळगावातील नंदगावात झाला. 1962 साली प्रतिभा पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन राजकारणास सुरुवात केली. 27 वर्षाच्या वयात त्या जळगाव विधानसभेच्या आमदार होत्या.