कशी झाली आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरूवात ? अन् तो 21 जूनलाच का ? , जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाची’ सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायस्वरुपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यांसारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावरती विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ साली या दिनाला मान्यता देण्यात आली आणि ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ अस्तित्वात आला.

म्हणून २१ जून रोजी योग दिवस
अनेकांना प्रश्न पडतो की, २१ जून रोजीच आंतरराष्ट्रीय योग दिन का साजरा केला जातो ? याच उत्तर म्हणजे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवसाला ग्रीष्म संक्राती म्हणून ओळखलं जात. भारतीय परंपरेनुसार ग्रीष्म संक्रातीनंतर सूर्याचे दक्षिणायन सुरु होते. तसेच असं म्हटलं जात की, सूर्याचे दक्षिणायन अध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी खूप लाभदायक असते. यामुळे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

भारताच्या नावावर दोन रेकॉर्ड
जगभरात २१ जून २०१५ ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. पहिल्या योग दिना दिवशीच भारताने दोन शानदार रेकॉर्ड देखील बनवले. या दिवशी पंतप्रधान मोदींनी ३५ हजार नागरिकांसह दिल्लीतील राजपथ मैदानावर योग केला होता. पहिले रेकॉर्ड ३५,९८५ नागरिकांसोबत योग करणे आणि दुसरे रेकॉर्ड ८४ देशांच्या नागरिकांचा सहभाग या कार्यक्रमात होणे.

यंदाचा योग दिन डिजिटल
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात योग दिनाचा कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील योग कार्यक्रमात सहभागी होतात. देशातील विविध राजकीय नेते, सेलेब्रिटी, खेळाडू सुद्धा योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेत असतात. परंतु, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदाचा योग दिन हा डिजिटल स्वरुपात होण्याची शक्यता आहे. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे सामूहिक कार्यक्रम यंदा पाहायला मिळणार नसल्याचं दिसत आहे. म्हणून, अनेक ठिकाणी नागरिक हे आपल्या घरातच योगा करुन योग दिनाच्या कार्यक्रमात सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होतील.