तब्बल ७ अब्ज ३ कोटी ४८ लाखांची मालक असलेल्या ‘मांजरी’चे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या जगात सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती असेल, मात्र श्रीमंत मांजराविषयी किती जणांना माहिती आहे. याच सर्वात श्रीमंत मांजराचे आता निधन झाले आहे. इंटरनेटवरील सेलिब्रिटी आणि जगातील सर्वात श्रीमंत मांजर अशी ओळख असलेल्या या ग्रुम्पी नावाच्या मांजराचे काल निधन झाले.

युट्युबवर प्रसिद्ध असलेली हि मांजर म्हणजेच ग्रुम्पी कॅट १०० मिलियन डॉलर म्हणजे ७ अब्ज, ३ कोटी, ४८ लाख रुपयांची मालकीन होती. वयाच्या ७ व्या वर्षी तिचे निधन झाले आहे. तिला मूत्रपिंडाचा संसर्ग झाला होता. तिच्या मृत्यूबाबत तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत मांजर म्हणून तिची ओळख होती. हॉलिवूडचा चित्रपट देखील तिच्यावर बनवला गेला होता. तिच्या चपट्या नाकामुळे ती सर्व मांजरांपेक्षा वेगळी दिसायची. जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॅगिझिनवरही कित्येकदा ती झळकली होती.
मॉरिसटाऊनचे प्रसिद्ध उद्योजक तबाथा यांची ही मांजर होती. २०१२ साली या मांजरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तिच्या चेहऱ्यावरील रागट हावभाव दाखवण्यात आले होते. हा व्हिडीओ टाकल्यानंतर काही दिवसांतच तिचे कोट्यवधी फॉलोवर्स झाले होते.