‘लैंगिक’ शोषण करणार्‍या नित्यानंदविरूध्द ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी, ‘रेड कॉर्नर’ची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप असलेला आणि स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु बाबा नित्यानंद याच्या विरोधात इंटरपोलने ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे. गुजरात पोलिसांनी बाबा नित्यानंद हा डिसेंबर महिन्यात देशातून फरार झाला असल्याचा दावा केला होता. आता गुजरात पोलीस देखील इंटरपोलला बाबा नित्यानंदचा शोध घेण्यास मदत करणार आहे.

बाबा नित्यानंदविरोधात कर्नाटकमध्ये बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. तसेच गुजरातमध्ये देखील लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा नित्यानंद हा लहान मुलांचं अपहरण करायचा आणि त्यांना अहमदाबाद येथील आश्रमात डांबून ठेवायचा. नंतर या निरागस मुलांना नित्यानंद त्याच्या अनुयायांसोबत दान गोळा करण्यासाठी पाठवायचा असा आरोप नित्यानंदवर आहे.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नित्यानंदच्या अनुयायी साध्वी प्राण प्रियानंद आणि प्रियातत्व रिद्दी किरण यांना अटक केलेली आहे. या दोघींवर तीन ते चार मुलांचं अपहरण करून त्यांना एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप आहे.

ब्ल्यू कॉर्नर नोटीस म्हणजे काय?
इंटरपोलकडून सदस्य देशांच्या गुन्हेगारासंबंधी नोटिसा जारी केल्या जात असतात. त्यामध्ये रेड कॉर्नर, ब्ल्यू, पर्पल, ऑरेंज, ब्लॅक आणि यलो अशा नोटिसांचा समावेश यात असतो. त्यातील ब्ल्यू कॉर्नर नोटीस ही फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी जारी करण्यात येते. जो कोणी आरोपी असेल किंवा नसेल, मात्र त्याच्यावर फौजदारी गुन्हा झाल्यास त्याच्याविरोधात ही नोटीस बजावली जाते.

फेसबुक पेज लाईक करा –