पेट्रोल, डिझेल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणार्‍या पंपातील पेट्रोल आणि डिझेल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली पोलिसंच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून एक ट्रक, 8 कॅन, एक हँडपंप, मेटल कटर पाना, पाईप, मोबाईल असा 11 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

लाला झिंगा काळे (वय 24), दशरथ ऊर्फ शंकर मधू काळे (वय 23), तानाजी बाबुश्या काळे (वय 22), शंकर सुरेश काळे (ऴय 19, सर्व रा. दोघेही रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी विशेष पथक नेमून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती काढली. त्यावेळी ट्रान्सपोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करत असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन सांगलीला येत असल्याचेही समोर आली होती. त्यानंतर ते सर्वजण गुरुवारी सांगलीत येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार तासगाव येथील तुरची फाट्यावरील एका पंपाची टेहळणी करणाऱ्या चौघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी पंपावरून पेट्रोल, डिझेल, चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून एक ट्रक (एमएच 16 बीसी 3099), 8 कॅन, एक हँडपंप, मेटल कटर पाना, पाईप, मोबाईल असा 11 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कर्नाटक आणि गुजरात येथील पेट्रोल पंपांवरही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून जिल्ह्यातील ११ गुन्हे उघडकिस आणण्यात यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलीस निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, अमित परीट, संजय पाटील, संदीप गुरव, शशिकांत जाधव, जितेंद्र जाधव, विजय पुजारी, युवराज पाटील, अरूण सोकटे, सायबर सेलकडील संदीप नलवडे, अतुल मोरे, भावना सुतगुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ह्या हि बातम्या वाचा –

“भारत फक्त आपलाच नाही, त्यांचाही”

मॅक्सवेलचा त्रिफळा उडवण्यात धोनीचाही हात ; पहा व्हीडिओ

पुण्याच्या मध्यवर्ती व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत