‘कोरोना’ संक्रमित पत्र पाठवून नेत्यांना बनवलं जाऊ शकतं निशाणा ! इंटरपोलनं दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरस महामारीचा धोका अजून टळलेला नाही. अनेक देशात कोरोनाची प्रकरणे कमी होऊ लागली होती. मात्र, आता तिथेसुद्धा स्थिती गंभीर होऊ लागली आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय एजन्सी इंटरपोलने दावा केला आहे की, दिग्गज राजकीय व्यक्तींना कोरोना संक्रमित करण्यासाठी पत्र पाठवून निशाणा बनवले जाऊ शकते.

इंटरपोलने जगभरातील सुरक्षा एजन्सीजला इशारा दिला आहे की, त्यांनी सावधगिरी बाळगावी आणि कोविड 19 ने संक्रमित कागदपत्रांबाबत सावध राहावे. कोविड संक्रमित पत्र किंवा कागदपत्रांद्वारे राजकीय व्यक्तींना निशाणा बनवले जाऊ शकते. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार इंटरपोलने जगातील अन्य देशांसह भारताच्या तपास एजन्सीजलासुद्धा इशारा दिला आहे, ज्यामुळे विविध कार्यप्रणालीच्या आधारावर देखरेख वाढवण्यावर विचार करण्यात आला आहे.

काही कोविड 19 संक्रमित पत्र मिळाली
इंटरपोलने म्हटले की, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि जागतिक नेत्यांना निशाणा बनवून कोरोना संक्रमित पत्र पाठवली जाऊ शकतात. याबाबत खूपच सतर्कता आवश्यक आहे. इंटरपोलनुसार जगातील मोठे नेते आणि दिग्गज लोकांना संक्रमित करण्याचा कट रचला जात आहे.

दिशानिर्देशांमध्ये म्हटले आहे, तपास एजन्सीजचे अधिकारी, डॉक्टर्स आणि अतिमहत्त्वाच्या वर्कर्सना घाबरवण्यासाठी त्यांच्या तोंडावर खोकणे किंवा थुंकण्याची उदाहरणे समोर आली आहेत. जर असे करणारा कोविड संक्रमित असेल तर धोका वाढू शकतो. पृष्ठभागांवर आणि वस्तूंवर थुंकणे आणि खोकून जाणीवपूर्वक संसर्ग पसरवण्याची माहिती मिळाली आहे. काही कोविड 19 संक्रमित पत्र मिळाली आहेत, ज्याद्वारे राजकीय व्यक्तींना निशाणा बनवले जाऊ शकत होते. हे काम करणार्‍या इतरांनाही प्रभावित करू शकते.