नीरेजवळील ज्युबिलंट कंपनीत वायु गळतीने सुमारे ४० कामगारांना बाधा

पुरंदर : पोलीसनामा आँनलाईन – पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निंबूत (नीरा) येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीत बुधवारी (दि.१७) दुपारी साडेचारच्या सुमारास अँसिटिक अनहायड्रेड या घातक वायुची गळती होऊन त्याचा उग्र वास प्रचंड प्रमाणात कंपनी परिसरात सुटल्याने कामगारांना चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. कंत्राटी व कायमस्वरूपी असे सुमारे ४० कामगारांना रुग्णवाहिकेतून नीरा व लोणंद येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यामुळे नीरा व परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. निंबुत (नीरा) येथे ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीचा सुमारे ३० वर्षांपासून अनेक रासायनिक पदार्थ उत्पादन करण्याचा प्रकल्प आहे. प्रत्यक्षदर्शनींकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१७) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास एका टँकरमध्ये अँसिटिक अनहायड्रेड हा घातक वायू भरत असताना तो टँकर ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे हा वायू हवेत पसरल्याने प्रथम कंपनीत अँसिडच्या प्लँटला काम करणाऱ्या काही अकुशल कंत्राटी कामगार व कायम कामगारांना डोळ्यात आग आग होऊन नाकावाटे वायू गेल्याने गुदमरण्यासारखे वाटू लागल्याने त्यांना तातडीने नीरा व लोणंद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वास्तविक, अँसिटिक अनहायड्रेड या वायूची गळती झाल्याने कंपनीने कामगारांना भोंगा वाजवून सावधानाची सुचना देणे जरूरीचे होते परंतू भोंगा न वाजवल्यामुळे ब-याच कामगारांना या विषारी वायूच्या त्रासाला सामोरे जावे लागले. तर काही कामगार त्रास होवू लागल्याने कंपनीच्या मागील बाजूने पळत पळत बाहेर पडले असल्याचे कामगार सांगत होते.

नीरा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये सुमारे १५ कामगार तर लोणंद येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये सुमारे २५ कामगारांना दाखल करण्यात आल्याचे समजते. यापैकी सुमारे चार कामगार लोणंद येथील हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ असल्याचे समजते. याबाबत कंपनी व्यवस्थापणाणे किती कामगारांना बाधा झाल्याची अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे बाधा झालेल्याची नांवे समजू शकले नाही. ज्युबिलंट कंपनीतून ज्यावेळी वायू गळती झाली त्याचा परिणाम कंपनी नजिक असलेल्या पाडेगांव(ता.फलटण) येथील शेतीत खुरपणा-या महिलांना ही याचा प्रचंड त्रास झाला असल्याचे समजते. या कंपनी मुळे परिसरातील नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता प्रत्यक्षात वायूची गळती कशी झाली हे पाहिल्यानंतर माहिती देतो असे सांगूण माहिती देण्यास टाळले.

यावेळी  वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक समाधान चवरे व  नीरा पोलिस दुरक्षेत्राचे सहा.फौजदार विजय होले यांनी कंपनी व हाँस्पिटल ला भेट देऊन  बाधा झालेल्या  कामगारांची पाहणी करुन माहिती घेतली.