दिलासादायक ! राज्यात आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ST ने प्रवास करता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, एसटी बस सेवा मागील काही महिन्यांपासून बंद आहे. आता राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा कोविड नियम पाळून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना प्रवास करताना काही नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे.

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 25 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा बंद होती. परंतु आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे. कोरोना संकट वाढत असले तरी एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरु करण्याचे संकेत मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिले होते.

यापूर्वी परिवहन विभागाने मे महिन्यात आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लोकांच्या मनात जबरदस्त भीती आहे. रेड झोनमधून इतर जिल्ह्यांमध्ये माणसं पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. काही लोकांनी विरोध केला, त्यामुळे आम्ही ताबडतोब आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं. तसेच आंतरजिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सेवा सरु करण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.