वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाणे परिसरातून महागड्या कारची चोरी करुन त्यांच्या कागदपत्रात आणि इंजिन बदलून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात विक्री करणाऱ्या टोळीला ठाणे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून ४ टोयोटो इनोव्हा, २ मारुती स्विफ्ट, १ मारुती स्विफ्ट डिझायर आणि १ ह्युंदाई सँट्रो अशा ऐकून ८ कार जप्त करण्यात आल्या आहेत. दहिसर, समता नगर, चारकोप, चतुःशृंगी, आंबोली आणि नया नगर पोलीस ठाण्यांतील गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार केली. त्यानुसार सीसीटीव्हीच्या साहाय्याने रणजित चौधरी, तारकेश्वर राय, सुनील चौरसिया, सुरेश चिमणी, राजा उर्फ विजय सलादी, भवरलाल उर्फ लाला उर्फ शेठ चौधरी , चुंद्रु श्रीनिवास उर्फ चुंद्रु श्रीनु चौधरी या आरोपींना अटक करण्यात आली. १५ ऑक्टोबर रोजी उदय इनामतीरा यांनी त्यांची टोयोटो इनोव्हा कार (एमएच ०९, डीए ६२००) अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याबाबत त्यांनी नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपस करत असताना सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून तांत्रिक बाबी तपासल्या असता वरील आरोपींना अटक करण्यात आली.

अशी आहे चोरी करण्याची मोडस ऑपरेंडी 
आरोपी राजा सलादी आणि भवरलाल चौधरी हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये भंगार तसेच अपघातग्रस्त कार विकत घेऊन गाडीचे मॉडेल, उत्पादनाचे वर्ष, रंग आदी बाबत सुनील चौरसिया (महाराष्ट्र एजंट) याला माहिती देऊन गाडी चोरण्यासाठी सांगत असे. सुनील चौरसिया हा मिळालेली माहिती रणजित चौधरी (मुख्य चोर) याला देऊन त्याच्यामार्फत आवश्यतेनुसार गाडीची चोरी करत असे. या गाड्या तारकेश्वर राय स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन सुरेश चिमानी, राजा सलादी आणि भवरलाल यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोचवत असे. त्यानंतर चोरीच्या गाड्यांवर अपघात झालेल्या किंवा भंगारमध्ये विकत घेतलेल्या गाड्यांचे इंजिन, चेसी क्रमांक आणि रजिस्ट्रेशन क्रमांक चढवून आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यामध्ये त्यांची विक्री करत असे अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी होती.