पोपटांची ‘तस्करी’ करणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 150 ‘पॅरोट’ जप्त

शिरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आदिवासींकडून घेऊन नागपूरच्या बाजारात पोपट विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून सुमारे १५० पोपटांना जप्त करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शिरपूरजवळ रविवारी रात्री रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या एका भरधाव टाटा इंडिका गाडीचा पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी ही गाडी थांबवून तपासणी केली तर गाडीत गोणपाट होते. त्यातून आवाज येत असल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्यांनी ते उघडून पाहिले तर त्यात तारांचे पाच पिंजरे होते. त्यात पोपट दाटीवाटीने कोंडले होते. वाहनचालक मोहम्मद अस्लम शेख फरीद (वय ३५, रा. रायपूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. रायपूर येथील आदिवासी लोकांकडून अवैधरित्या पोपटांची खरेदी करुन जादा भावाने नागपूरच्या बाजारात पोपटांची विक्री करीत असल्याचे त्याने सांगितले.

या ५ पिंजऱ्यात १५० पोपट आढळून आले. हे पोपट तो प्रत्येकी २०० रुपये या दराने विक्री करीत असे. त्याला या कामात मदत करणाऱ्या मोहम्मद जाबीर मोहम्मद महेबुब (रा़ संजयनगर, रायपूर) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पशूपक्ष्यांची वाहतूक करुन तस्करी केल्याबद्दल गुन्हा दाखल करुन त्यांना वन विभागाच्या हवाली करण्यात आले आहे.