समाजात असहिष्णुता वाढत आहे त्यामुळे येणार काळ कठीण : अमोल पालेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेते नसरूद्दीन शाह यांच्या वक्तव्याने निर्माण झालेला वाद अजुन शमलेला नसतानाच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नसरूद्दीन शाह यांची पाठराखण केलीय. सध्या समाजात मोठ्या प्रमाणात असहिष्णुता वाढत आहे त्यामुळं येणार काळ कठीण आहे. नसरूद्दीन शाह आणि अमिर खान यांना ट्रोल केलं जातंय कारण ते खान आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. पालेकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवात आज ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना यंदाचा ‘झेनिथ एशिया सन्मान’ नवसिनेमाचे प्रणेते कुमार शाहनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी अमोल पालोकर बोलत होते.

प्रादेशिक सिनेमांचा मी पाठीराखा आहे. माझ्याबरोबरच्या अभिनेत्रींची भूमिका मूर्खपणाची असू नये असे मला वाटते. टी एम कृष्णा यांचा कार्यक्रम रद्द केला जातो ही असहिष्णुता का निर्माण झाली याच्या मी शोधात आहे असंही ते म्हणाले. अर्बन नक्सल ही काय संज्ञा आहे असा सवालही त्यांनी केला.

देशात वाढत असलेली असहिष्णुता आणि मॉबलिंचिंगच्या घटनांवर प्रसिद्ध अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. समाज म्हणून आपण कुठे जात आहोत याचा विचार केला पाहिजे असं ते म्हणाले. बुलंदशहरमध्ये घडलेल्या हिंसाचारावरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या देशात पोलिसांच्या जीवापेक्षा गायीच्या जीवाला जास्त महत्त्व आलं आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

शाह आपल्या सडेतोड विचारांसाठी ओळखले जातात. ते म्हणाले, “मला नेहमी भीती वाटते की कधी संतप्त जमावाने माझ्या मुलाला पकडलं आणि विचारलं की तुझा धर्म कुठला आहे? हिंदू की मुस्लिम? तर तो काय उत्तर देणार? कारण आम्ही मुलांना फक्त माणूसकीचाच धर्म शिकवला. त्यामुळं त्यांना इतर धर्म त्यांना माहितच नाहीत.”