अवैध धंद्यातून गुंडांकडून ‘लेडी डॉन’ पिंकीवर चाकूने सपासप वार करून खून; नागपूरच्या रस्त्यावरील थरार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पाचपावली तांडा पेठ परिसरात अवैध धंद्यातील वादातून स्वत:ची गँग चालविणाऱ्या लेडी डॉनवर तिघा हल्लेखोरांनी वार करुन निर्घुण हत्या केली. पिंकी लखनलाल वर्मा (वय २७) असे या तरुणीचे नाव आहे. पिंकी ही मुळची छत्तीसगडमधील राजनंदगाव येथील रहिवासी आहे. पिंकी नाईक तलाव परिसरात एका मैत्रिणीसह रहात होती. पिंकी वर्मा ही स्वभावाने अत्यंत आक्रमक होती. तिची स्वत:ची गॅग होती. त्या जोरावर ती अवैध धंदे चालवत होती. पिंकीच्या गँगचे दारू विक्री, जुगार अड्डे होते.

लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकाने बंद असल्याने तिच्या अवेध धंदा तेजीत आला होता. त्यातून स्थानिक तांडापेठ परिसरात जुगार अड्डा, दारु अड्डा चालविणार्‍यांबरोबर तिचा वाद झाला होता. तिने पाचपावली पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यावरुन त्यांच्यातील वाद आणखी पेटला होता. तेव्हा पिंकी हिने १५ दिवसात सर्व धंदे बंद करा, असा इशारा दिला होता. सोमवारी दुपारी पिंकी तिच्या घराबाहेर उभी होती. त्यावेळी तिघे जण तेथे आले. त्यांनी तिला शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने हल्ला केला. पिंकीने त्यांना प्रतिकार केला.

त्यानंतर जीव वाचविण्यासाठी ती बाजूला असलेल्या घराकडे धावली. मात्र, हल्लेखोरांनी केलेल्या वारामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने ती घरासमोरच कोसळली. ती पडल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले. भर रस्त्यावर हा थरार रंगला होता. परंतु, कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही. हल्लेखोर पळून गेल्यावर आजू बाजूचे लोक धावले. त्यांनी तिला जवळच्या डॉक्टरकडे नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पिंकी ही अवैध धंद्यांची पोलिसांना माहिती देत, असा गुन्हेगारांचा संशय होता. त्यात येथील जुगार व दारु अड्डेवाल्यांची तिचा वाद झाला होता. त्यावरुन तिची हत्या झाल्याचे सांगण्यात येते.