‘त्या’ प्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठा ‘झटका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रतिष्ठित बिजनेस स्कूल आयएमटी गाझियाबादच्या अडचणी वाढल्या आहेत. गाझियाबाद डेव्हलपमेंट अथॉरिटीने आयएमटी संस्थेला मिळालेल्या 10,841 यार्ड जागेचे वाटप रद्द केले आहे. गाझियाबाद महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक राजेंद्र त्यागी यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली आहे. ही बिजनेस स्कूल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ कुटुंबाशी संबंधित आहे. कमल नाथ यांचा धाकटा मुलगा, बक्कुल नाथ हे त्याच्या गवर्निंग काउंसिलचे अध्यक्ष आहेत.

भाजपचे नगरसेवक आणि तक्रारदार राजेंद्र त्यागी यांनी या प्रकरणात सांगितले की, मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांना तक्रार केली होती. आयएमटी गाझियाबाद ज्या जमिनीवर निर्माण झाले आहे, ती जमीन आयएमटीची नाही. ती इतर कोणाची तरी आहे. आयएमटीसाठी वाटप केलेल्या 54.049 यार्ड पेक्षा जास्त जमीन जे अंदाजे 10.841 चौरस यार्डवर संस्थेने कब्जा केला आहे. गाझियाबाद विकास प्राधिकरणाने माझ्या तक्रारीवर सदरील वाटप रद्द केले आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

राज्यपाल राम नाईक यांच्या सूचना लक्षात घेऊन चौधरी चरण सिंह विद्यापीठने चार सदस्य असणारी चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती तपास करणार आहे की ज्या जमिनीवर लजपत राय डिग्री कॉलेज बनणार होते त्या जमिनीवर आयएमटीचा कब्जा का आहे. दुसरीकडे आयएमटी गाझियाबाद यांनी म्हंटले आहे की त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. गाझियाबाद डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून चुकीचा निर्णय घेतला गेला आहे.