‘केडगाव हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा’

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – अटक केलेल्या माजी महापौर संदीप कोतकर याला न्यायालयात हजर केल्यानंतर तो न्यायाधीशांसमोर हात जोडून गहिवरला. ‘मी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जन्मठेपेच्या वेदना काय असतात, हे मी पाहत आहे. असे असताना मी दुसऱ्या खुनाचा विचारही करू शकत नाही. मी निर्दोष आहे. या प्रकरणाची सीबीआय अथवा इतर यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करा’, अशी विनवणी त्याने न्यायालयास केली.
सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने बोलण्यास न्यायाधीशांकडे परवानगी मागितली. परवानगी दिल्यानंतर त्याने सांगितले की, ‘मी न केलेल्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे कोणाचा विचारही माझ्या डोक्यात येऊ शकत नाही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा किंवा अन्य कुठली निष्पक्ष चौकशी करा हीच माझी न्यायालयास विनंती आहे.
‘माझी नार्को करा’
संदीप कोतकर नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्याचे नाव केडगाव दुहेरी हत्याकांडाचा कटात असल्याचे समजल्यावर त्याने कारागृहातून न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जात संदीप कोतकर याने स्वतःची नार्को करण्याची मागणी केली होती.
काय म्हणतोय तपास
 केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने नगर येथील न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात खुनाच्या कटात संदीप कोतकर याचा सहभाग असल्याचे प्राथमिक दोषारोपपत्रात नमूद केलेले आहे. संदीप कोतकर व  माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यात मोबाईलवरून चर्चा केली होती. संदीप याच्या सांगण्यावरूनच संदीप गुंजाळ उर्फ डोळश्या याला सुवर्णा कोतकरने मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्याकडे  जाण्यास सांगितले होते. त्यानंतरच हत्याकांड झाले.  हत्याकांडाच्या दिवशी संदीप कोतकर हा दिवसभर कारागृहाबाहेर होता. त्याचे मोबाईलवरून पत्नी सुवर्णा कोतकर हिच्यासोबत अनेकदा बोलणे झाले होते. त्यामुळे ‘सीआयडी’ने गुन्ह्याच्या कटात संदीप कोतकर याचा सहभाग असल्याचे दोषारोपपत्रात नमूद केलेले होते. संदीप कोतकर हा सध्या नाशिक कारागृहात अशोक लांडे खून प्रकरणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.  त्याचा गुन्ह्यात सहभाग असूनही त्याला सीआयडीकडून वर्ग करून घेतले जात नव्हते. अखेर सोमवारी रात्री त्याला वर्ग करून घेत सीआयडीने अटकेची कार्यवाही पूर्ण केली आहे.