पुरंदर तालुक्यातील गोमूत्र शिंपडणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याची चौकशी सुरू

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे)  – पूरग्रस्त भागात प्रतिनियुक्तीवर गेलेले पुरंदरचे गट विकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी तेथून परत आल्यानंतर आपल्या कार्यालयाची गोमूत्र शिंपडून साफसफाई केल्याप्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी सुरू केली आहे तर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात येत्या पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करून त्यासंदर्भातील अहवाल देण्याच्या सूचना आहेत.

जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी, अभियंते यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये सांगली, कोल्हापूर मध्ये पाठवले होते, त्यानुसार टोणपे यांनाही पाठवले होते. या दरम्यान त्यांचा पदभार अतिरिक्त गटविकास अधिकार्‍यांकडे देण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी प्रशासकीय कार्यालयात बसू नये अशी ताकीद अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्याला दिली होती, याबाबत अतिरिक्त गट विकास अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे टोणपे बाबत तक्रार केली होती. यावरून त्यांना कडक शब्दात सुचना केल्या. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांना पदभार घेण्यास तसेच कार्यालयात बसण्याच्या सूचना केल्या.

अतिरिक्त गटविकास अधिकार्‍यांनी आपले कामकाज सुरू केले. मात्र ते काम करताना टोणपे यांनी कोल्हापुरातुनही अडथळे आणले. पूरग्रस्त भागातील कामकाज संपले नसतानाही ते वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी न घेता स्वातंत्रदिन कार्यक्रमासाठी सासवडच्या कार्यालयात आले होते आणि पुन्हा पूरग्रस्त भागत कामासाठी गेले. तेथून परत आल्यानंतर त्यांनी गोमूत्र शिंपडून कार्यालयाची साफसफाई केली.

या बाबीची राज्यभर चर्चा होत असल्याने राज्‍यमंत्री विजय शिवतारे हे या प्रकरणाची दखल घेणार आहेत. ते कशा प्रकारे या प्रकरणाची दखल घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –