राणा कपूर संदर्भात CBI आणि ED नं केला मोठा खुलासा, ‘या’ प्रकारे उडवले ‘दलाली’चे पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्याविरूद्ध अनेक मोठे खुलासे केले आहेत. माहितीनुसार, राणा कपूर यांच्यावर एका ग्रुप कंपनीचे १९०० कोटी रुपयांचे रखडलेले कर्ज कमी करण्यासाठी ३०७ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. या पैशांच्या मदतीने राजधानी दिल्लीतील लुटियन्स झोनसारख्या व्हीव्हीआय भागात एक आलिशान बंगला विकत घेण्यात आला. दरम्यान, राणा कपूर व्यतिरिक्त सीबीआयने त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि त्यांची अवंथा रियल्टी लिमिटेड नावाच्या कंपनीचे प्रवर्तक गौतम थापर यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल केला आहे. या रियल्टी कंपनीने हा बंगला राणा कपूरला विकला असल्याचे सांगण्यात येत आहे. बिंदू कपूरची आणखी एक कंपनी, ब्लिस अबोड प्रायव्हेट लिमिटेड यात सहभागी आहे.

शुक्रवारी सीबीआयने मुंबईत राणा कपूर आणि त्यांची पत्नी बिंदू यांच्या घरावर छापा टाकला. सोबतच ब्लिस अबोड प्रायव्हेट लिमिटेड, थापर आणि अवंथा ग्रुपच्या कार्यालयांवरही तपास करण्यात आला. त्याच वेळी, दिल्ली एनसीआरमध्ये इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या ठिकाणी शोध घेण्यात आला. दरम्यान, इंडियाबुल्स हाऊसिंगने आपल्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, त्यांच्या कोणत्याही ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला नाही.

इंडियाबुल्स आणि सीबीआयच्या निवेदनात फरक
कंपनीचे सचिव अमित जैन यांच्या म्हणण्यानुसार, ‘सीबीआयचा हा छापा राणा कपुर आणि येस बँकेच्या ठिकाणी होता. यापैकी काही ठिकाणी इंडियाबुल्स हाऊसिंग आहे. परंतु ती राणा कपूर किंवा येस बँकेने भाड्याने घेतली आहे. सीबीआयला याबाबत विचारले असता समजले कि, इंडियाबुल्स हाऊसिंगच्या ठिकाणांवरच छापे टाकण्यात आले आहेत.

७८ कंपन्या उघडून ४० कंपन्यांत खपवला पैसा
माहितीनुसार राणा कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांनी दलालीचे पैसे खपविण्यसाठी जवळपास ७८ कंपन्या उघडल्या आहेत. हे भांडवल खपविण्यासाठी देश-विदेशात ऐकून ४० हून अधिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे. माहितीनुसार ईडीने या मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे शोधून काढली असून त्यांची पडताळणी केली जात आहे. या ४० पैकी २८ ठिकाणे भारतात असून यातील सर्वात जास्त दिल्ली एनसीआर आणि लुटियन्स झोन सारख्या व्हीव्हीआयपी ठिकाणी आहेत.

कशी केली फसवणूक ?
कपूर कुटुंबाने यूके आणि अमेरिकन हॉटेल आणि क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. कपूर कुटुंबाच्या मालकीची बहुतांश कंपन्या रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी सहाय्यक कंपन्या आहेत. येस बँकेने कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज दिले असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या कर्ज घेणार्‍या बहुतांश कंपन्या नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) आहेत. या एनबीएफसीने घेतलेल्या कर्जाचा मोठा भाग एनपीए होण्याच्या मार्गावर आहे. राणा कपूर यांनी या कंपन्यांसह कट रचला आणि त्यांची पत्नी व मुलींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.