कमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीमुळे अनेकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. असे असले तरी या महामारीमुळे आपल्याला पैसे आणि आपले आरोग्य याचं गणित किती महत्त्वाचं आहे हे समजलं आहे. कोरोना काळात जे काही झालं त्यामुळे प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे अनेकांचा कल हा बचतीकडे वाढू लागला आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि कमी पैशात जास्तीत जास्त नफा देणाऱ्या काही योजना आहेत. जाणून घेऊ यात कोणत्या योजनांमधून कमी कालावधीत अधिक रक्कम मिळते.

बँक एफडी
अनेक बँकांमध्ये मुदत ठेवीवर चांगला परतवा मिळतो. बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणं यासाठी चांगलं आहे. कारण यामध्ये भांडवल सुरक्षित राहते आणि गुंतवणुकीची पूर्तताही वेळेवर केली जाते. बँक एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरवर्षी ठरलेल्या व्याजानुसार परतावा मिळतो.

लिक्विड फंड
जर कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी लिक्विड फंड उत्तम पर्याय असू शकतो. सध्याची तरुणाई यालाच जास्त पसंती देते. खरंतर हा एक डेट म्युच्युअल फंड आहे. यामध्ये 91 दिवसांच्या मॅच्युरिटी कालावधीसह उपकरणांमध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये गुंतवणूकदार 1 ते 3 महिने गुंतवणूक करु शकतो.

कॉर्पोरेट एफडी
बाजारामध्ये अनेक कंपन्या आहेत, ज्या कामांच्या गरजा भागवण्यासाठी कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर करतात. या कंपन्या एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूकदारांकडून भांडवल घेते. ज्याला कॉर्पोरेट एफडी असे म्हटले जाते. याला चांगला व्याजदर मिळत असल्याने अनेकजण यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात.

पोस्ट ऑफिस डिपॉझिट
लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत गुंतवणूकीचे आणि बचतीचे उत्तम पर्याय पोस्ट ऑफिसमध्ये मिळतात. म्हणजेच काय तर कोणत्याही वयोगटातील व्यक्ती पोस्टात गुंतवणूक करु शकते. पोस्टामध्ये कमीत कमी पैशात आणि कमी कालावधीसाठीही उत्तम गुंतवणूक करु शकता.

इकरिंग डिपॉझिट
प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची ही योजना आहे. यासाठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम असतात. गुंतवणुकीचा हा देखील एक चांगला पर्याय आहे. नोकरी किंवा रोजचा इनकम असलेल्या लोकांसाठी बचत करण्याची ही चांगली योजना आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या पैशांतून बचतीचे पैसे जमा करु शकता आणि ज्यामध्ये व्याज मिळवू शकता.

स्वीप-इन एफडी
समजा तुमच्या एखाद्या बँक खात्यामध्ये पैसे राहिले असतील तर बँक तुम्हाला हे पैसे एफडीमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देते. यालाच स्वीप-इन एफडी म्हणतात. ही एफडी बचत खात्याशी जोडलेली असते. ज्यामध्ये तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढता येतात. म्हणजेच जर बचत खात्यामध्ये आवश्यक रकमेपेक्षा जास्त पैसे असतील तर बँक खातेदाराच्या परवानगीने ती रक्कम एफडीमध्ये वळवली जाते. यावर तुम्हाला व्याज मिळू शकते. काही बँका मुदत ठेवीच्या व्याजदराप्रमाणे व्याज देतात.