फायद्याची गोष्ट ! सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता FD पेक्षा जास्त ‘रिटर्न’, जाणून घ्या योजनेसंदर्भातील खास गोष्टी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सरकारने यावर्षी 1 जुलैपासून फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉंड्स 2020 (करपात्र) योजनेची ऑफर आणली आहे. सरकारने ही योजना 7.75 % करपात्र बचत रोख्यांच्या जागी आणली आहे. सरकारने सात वर्षांच्या मुदतीसह फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉंड्स एफआरएसबी 2020 (T) ची ऑफर दिली आहे. 1 जुलै रोजी वर्गणीसाठी ही योजना उघडली आहे. कोणताही भारतीय नागरिक किंवा अविभाजित हिंदू कुटुंब या बाँडमध्ये गुंतवणूक करु शकते. या योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह अ‍ॅक्सिस बँक, आयडीबीआय बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या खाजगी क्षेत्रातील बँकांकडून देखील बाँड खरेदी करता येतील.

गुंतवणूकीची मर्यादा किती आहे

कर व गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन म्हणाले की, कोणतीही व्यक्ती या योजनेत किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करू शकते. त्याचबरोबर सरकारने या योजनेतील गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

तुम्हाला किती परतावा मिळेल

सरकारने या योजनेचा व्याज दर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र + 0.35 टक्के जोडला आहे. जैन म्हणाले की या योजनेंतर्गत प्रत्येक सहा महिन्यांच्या अंतराने व्याज निश्चित केले जाईल. म्हणजेच या बाँडवरील व्याज दर दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी निश्चित केला जाईल.

आता मिळेल इतके व्याज

जैन म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी सरकारने एनएससीवरील व्याज दर 6.80 टक्क्यांवर कायम ठेवले आहे. यामुळे, 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत या योजनेचा व्याज दर 7.15 टक्के आहे. या योजनेत गुंतवणूक करणार्‍यांना सरकार सहामाही आधारावर व्याज देईल.

या योजनेत किती फायदा होईल

जैन म्हणाले की, आरबीआयने रेपो दर कमी केल्यावर बँक एफडी दर खाली आले आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षित परतावा मिळण्यासाठी कोणतीही व्यक्ती या योजनेतील या गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकतो. ते म्हणाले की या योजनेतील गुंतवणूकीची मर्यादा निश्चित केलेली नाही, ज्यामुळे ती अधिक आकर्षक बनते.