पोस्ट ऑफिस ‘बचत’ खात्याच्या ‘किमान’ रक्कमेत वाढ, जाणून घ्या ‘नियम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसने बचत खात्याची किमान जमा रक्कमेची मर्यादा 50 रुपयांवरुन 500 रुपये केली आहे. यासंबंधित नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. या बदलानुसार पोस्ट ऑफिसमध्ये 500 रुपये किमान रक्कम (मिनिमम बॅलन्स) न ठेवल्यास आर्थिक वर्षांच्या अखेरच्या कामकाजी दिवसात त्यांच्या खात्यातून 100 रुपये रक्कम दंडाच्या स्वरुपात कापण्यात येईल.

पोस्ट ऑफिस निदेशालयातून सर्व पोस्ट ऑफिसला आणि बचत खातेदारांना संपर्क साधून ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान रक्कमेची मर्यादा 50 रुपये असल्याने भारतीय पोस्टला दरवर्षी तब्बल 2,800 कोटी रुपये नुकसान होत होते.

जर आर्थिक वर्षाच्या अखेरीस पोस्ट ऑफिस बचत खात्यात जीरो बॅलेंस असेल तर हे खाते आपोआप बंद होईल. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरु करु इच्छित असाल तर तुम्हाला खात्यात किमान 500 रुपये रक्कम ठेवावी लागेल. हे खाते तुम्ही फक्त रोख रक्कम देऊनच सुरु करु शकतात.

ग्राहक पोस्ट ऑफिस बचत खाते सिंगल, ज्वाइंट किंवा अल्पवयीन मुलांच्या नावे सुरु करु शकतात. यानंतर खातेदार चेक बुक आणि एटीएम सुविधेसाठी पात्र ठरतील. खातेदारांना एका आर्थिक वर्षात कमीत कमी एक व्यवहार करणे आवश्यक आहे.

पब्लिक प्रोविडेंट फंड, टॅक्स डिपॉजिट स्कीम्स, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, सुकन्या समृद्धी योजना, सीनिअर सिटीजन सेविंग स्कीम इत्यादी पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय छोट्या बचत योजना आहेत.