INX प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार, कोर्टानं जामीन फेटाळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच 3 दिवसांची मुदतवाढही फेटाळून लावली आहे.

चिदंबरम यांनी अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर तीन दिवसांची मुदतवाढ मागितली होती. अटकपूर्व जामीन अर्ज आणि तीन दिवसांची मुदतवाढ फेटाळून लावल्यानंतर आता ईडी आणि सीबीआय  चिदंबरम यांच्याकडून अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी 305 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण 2007 मधील असून, तेव्हा चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.  या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत.

2017 मध्ये सीबीआयने या प्रकरणी एफआयआर नोंदविला होता. तर ईडीने 2018 मध्ये  मनी लॉन्ड्रिंगचा  गुन्हा दाखल केला होता.  ह्या प्रकरणाला मोठे वळण तेव्हा लागले जेव्हा इंद्राणी मुखर्जी साक्षीदार बनली. या प्रकरणात आयएनएक्स मीडियाची प्रमुख आणि आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला साक्षीदार बनवण्यात आले आणि तिचा जबाबही रेकॉर्ड केला गेला आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मुखर्जी यांनी साक्ष दिली की त्यांनी कार्ती चिदंबरम यांना दहा लाख रुपये दिले.

आरोग्यविषयक वृत्त