IPLची ‘ट्रॉफी’ देण्यावरून BCCIच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएल २०१९ चे बारावे पर्व पार पडून आता एक आठवडा उलटला आहे. मात्र यावरून निर्माण झालेला वाद काही थांबायचे नाव घेत नाही आहे. या पर्वात अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळवले. मात्र आता याच विजेतेपदाची ट्रॉफी देण्यावरून बीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना आणि प्रशासकीय समिती सदस्य डायना एडुल्जी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. विजेत्या संघाला ट्रॉफी कुणी द्यायची यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

सी. के. खन्ना यांनी मुंबई इंडियन्सला विजेतेपदाची ट्रॉफी दिली आणि या वादाला सुरुवात झाली, असे म्हटले जाते. यावेळी डायना एडुल्जी देखील उपस्थित होत्या, त्यांनी विजेत्या संघाला धनादेश दिला मात्र ट्रॉफी त्यांना देता आली नाही. यानंतर डायना यांनी बीसीसीआयवरील अधिकाऱ्यांवर आगपाखड केली आहे. त्यामुळे आता वातावरण आणखीनच गरम झाले आहे. महिलांच्या आयपीएल स्पर्धेवेळी विजेत्या संघाला डायना यांनीच जेतेपदाचा चषक दिला होता. त्यामुळे पुरुषांच्या आयपीएलमध्येही आपल्याला जेतेपदाची ट्रॉफी देण्याचा सन्मान मिळेल, असे डायना यांना वाटले होते.

दरम्यान, आयपीएल स्पर्धेची ट्रॉफी देण्याचा मान हा बीसीसीआय अध्यक्षलाच असतो, असे काही जणांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय मालिकेत देखील तेच विजेतेपदाची ट्रॉफी देतात. यावर डायना म्हणाल्या कि, भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेवेळी ट्रॉफी देण्याचा अधिकार असताना त्यांनी ती न देता त्याचा अपमान केला होता. त्यामुळे आता आयपीएलच्यावेळी प्रशासकीय समितीच्या सदस्यांना विजेतेपदाची ट्रॉफी देण्याचा अधिकार द्यायला हवा होता.