IPL 2019 : फायनलची तिकीटं अवघ्या २ मिनिटांत विकली

हैदराबाद : वृत्तसंस्था – आयपीएल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आता फक्त दोनच सामने शिल्लक आहेत. फायनलमध्ये मुंबई इंडियन्स संघ पोहोचला आहे. आता चेन्नई आणि दिल्ली यापैकी कुणाला फायनलचं तिकीट मिळतंय याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, हैदराबादमध्ये रंगणाऱ्या फायनल लढतीची तिकीटं अवघ्या दोन मिनिटांत विकली गेली आहेत. सर्व तिकीटे दोन मिनिटांत कशी विकली गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आयपीयलची फायनल १२ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी काल बीसीसीआयने तिकीट विक्री चालू केली. त्याची पूर्वकल्पनाही दिली नाही. तरीही अवघ्या दोन मिनिटांत सर्व तिकीटे विकली गेली. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात आता चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हैदराबादच्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता ३९ हजार आहे. एरवी २५ ते ३० हजार तिकीटांची विक्री होते. मात्र, यावेळी सर्व तिकीटे कशी विकली गेली ? याचं उत्तर अनेकांना मिळालं नाही. याबाबत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीच्या एका सदस्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १०००, १५००, २००० आणि ५००० या किमतीच्या तिकिटांची विक्री झालेली असून १०,०००, १२,५००, १५००० या रकमेची तिकिटे कुठे गेली याची माहित नसल्याची प्रतिक्रिया इव्हेंट्स नाऊच्या सुधीर रेड्डी यांनी दिली आहे. आम्हाला जी तिकिटं मिळाली ती आम्ही विकली बाकी आम्हाला याबाबत माहित नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.