चवताळलेल्या पाकिस्तानचे ‘आयपीएल’ विरोधात पुन्हा रडगाणे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – मागील काही वर्षांत बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद आहेत. तसंच मागील काही दिवसांपासून हे वाद आणखीच ताणले गेले आहेत. त्यात पाक क्रिकेट बोर्डाला आयसीसीच्या दरबारात हार पत्करावी लागली. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच चवताळला आहे. त्यामुळे पाकिस्तानला नवनवीन खुरापती सुचत आहेत. पाकिस्तानने आयपीएलच्या बाराव्या हंगामाचे सामने पाकिस्तानात प्रसारित केले जाणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी हा निर्णय घेतला आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलत असताना चौधरी यांनी हा निर्णय सांगितला.

पाकिस्तान सुपर लिग दरम्यान भारतीय कंपन्या आणि सरकारने आम्हाला जी वागणूक दिली, ती पाहता पाकिस्तानमध्ये आयपीएलचे सामने दाखवले जाणार नाहीत, असं चौधरींनी सांगितलं. आम्ही क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही गोष्टी नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने ‘आर्मी कॅप’ घालून सामना खेळला, ज्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं म्हणत त्यांनी यावर आपली बाजू मांडली.

दरम्यान, आयपीएलच्या बाराव्या हंगामाला शनिवारपासून म्हणजे २३ मार्चला सुरुवात होणार आहे. उद्या होणाऱ्या पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ आणि विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची झुंज दिसणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. तसंच या सामन्यात देशातील सर्वांधिक लोकप्रिय कर्णधारांचे संघ असणार आहेत. त्यामुळे या सामन्याला चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करेलच. मात्र, पहिल्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याचीही उत्सुकता चाहत्यांना आहे.