IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, खेळाडूंसाठी नियमच बदलला

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) साठी सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि सात दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुन काही संघानी सरावाला सुरुवात केली आहे. मात्र, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांना सराव सुरु करता आला नाही. कारण दोन्ही संघाच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी विलगीकरण राहावे लागणार होते. पण आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या मध्यस्थीनंतर विलगीकरणाचा नियम बदलण्यात आला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स साठी का होता वेगळा नियम?

‘आयपीएल’मधील दुबईस्थित सहा संघानी ‘आयसीसी’ क्रिकेट अकादमीत सरावाला प्रारंभ केला आहे, कारण तिथे सात दिवस विलगीकरणाचा नियम आहे. परंतु मुंबई आणि कोलकाता या बलाढ्य संघाना सरावाला प्रारंभ करता आले नव्हते, कारण त्यांचे निवास असलेल्या अबू धाबी शहरात १४ दिवस विलगीकरणं बंधनकारक होते.

अमिरातीमधील शहरांच्या या भिन्न नियमावलीचा फक्त कोलकाता आणि मुंबई इंडियन्सलाच फटका बसलेला नाही, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही वेळापत्रकाचा पुर्नविचार करावा लागणार आहे. १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘आयपीएल’मधील २१ सामने अबू धाबी आणि दुबईत होते, तर १४ सामने शारजात होणार होते. शारजातून दुबईत किंवा दुबईतून शारजात प्रवेश करताना कोणीतही अडचण नव्हती. मात्र अबू धाबी शहरात प्रवेश करताना शीघ्र चाचणीला सामोरे जाणे बंधनकारक आहे. ही चाचणी नकारात्मक आली तरच अबू धाबी शहराची सीमा ओलांडता येते.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची मध्यस्थी

दरम्यान, एमिरेट्स क्रिकेट मंडळाला विनंती केल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांना आजपासून सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ आजपासून सराव करण्यास मैदानात उतरणार आहे.