IPL 2020 : रिक्षा चालकाच्या मुलानं घडवला इतिहास !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League- IPL 2020) च्या 13 व्या पर्वात बुधवारी विराट कोहली (Virat Kohli) याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) या संघानं कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विकेट राखून विजय मिळवला. KKR नं प्रथम फलंदाजी केली. केकेआरनं 20 षटकात 8 बाद 84 धावा केल्या. RCBनं हे लक्ष्य 13.3 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं.

आरसीबीनं (RCB)हा विजय मिळवत गुणतालिकेत 14 गुणांसह (10 सामने, 7 विजय व 3 पराभव) दुसऱ्या स्थानी झेप घेतली. आरसीबीच्या या विजयात मोहम्मद सिराज यानं (Mohammed Siraj)सिंहाचा वाटा उचलला.

सिराजसाठी 2019 ची आयपीएल काही खास ठरली नाही. 9 सामन्यात त्यानं 7 विकेट्स घेतल्या होत्या आणि 9.55 च्या इकॉनॉमीनं धावा दिल्या होत्या. त्यामुळं यंदाच्या मोसमात त्याला संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु या वर्षभराच्या काळात सिराजनं प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचं फळ आजच्या सामन्यात पहायला मिळालं.

कॅप्टन कोहलीनं सामन्यानंतर सिराजचं कौतुकही केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं 4 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत आणि इकॉनॉमी रेटही 7.85 एवढा खाली आणला आहे. आजच्या सामन्यात सिराजनं 4 षटकात 2 निर्धाव षटकं टाकून 8 धावात 3 विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सलग 2 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रमही त्यानं नावावर केला.

हैदराबाद येथील एक गरीब कुटुंबात जन्मलेल्या सिराजसाठी हा प्रवास एवढ सोपा नव्हता. त्याचे वडिल रिक्षा चालक होते. रिक्षा चालक असूनही वडिलांनी सिराजला कधी काही कमी पडू दिलं नाही.

सिराज दिवसभर तर सराव करायचाच. परंतु तो रात्रीही सरावाला जायचा. जास्त सराव करत असल्यानं त्याला आईकडून अनेकदा मारही खावा लागला आहे. त्याची हीच जिद्द त्याला आयपीएलपर्यंत घेऊन आली.

सनरायजर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) 2017 मध्ये मोहम्मद सिराजला 2.6 कोटीत आपल्या ताफ्यात घेतलं आणि त्यानं मागे वळून पाहिलं नाही. त्याच वर्षी त्यानं भारताच्या ट्वेंटी-20 संघातून पदार्पण केलं.

2019 मध्ये सिराजनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे संघातून पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर (International Cricket) त्याला आपली छाप पाडता आलेली नाही. परंतु त्यासाठी तो तयार होत असल्याचं आजच्या कामगिरीनं दिसलं हे काही नाकारता येत नाही हेही तितकंच खरं आहे.

You might also like