IPL 2020 : आयपीएल मॅच बघण्याचे ‘वांदे’ होणार, फ्रँचायझींचा मोठा निर्णय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या मोसमावर जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना विषाणूचे सावट आहे. त्यामुळे आयपीएल रद्द होणार की काय अशी शंका निर्माण होत आहे. पण, आयपीएलच्या फ्रँचायझिंना तसे होऊ द्यायचे नाही. कारण तसे जर झाले तर त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळेच त्यांनी एक शक्कल लढवली असून आयपीएलचे सामने बंद स्टेडियममध्ये खेळले जातील असे समजत आहे. परंतु यामुळे प्रेक्षकांना थेट फटका बसणार आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरात जवळपास ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आश्चर्यकारक बाब म्हणजे रविवारी एकाच दिवसात सुमारे १७५२ लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर यापैकी तब्बल ८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगभरातून एकट्या चीनमध्ये ८० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ३००० लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १,०७,८०३ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता आयपीएलच्या सामन्यांना कोणत्याही प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की आयपीएलचे सामने हे पुढे ढकलण्यात यावेत. लवकरच आरोग्य मंत्री आणि बीसीसीआय यांच्यात बैठक होईल असे वृत्त समोर येत आहे. दरम्यान आयपीएलचा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमत असते. जवळपास ३० ते ४० हजार लोक सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या प्रेक्षकांमध्ये परदेशातील लोकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यामुळे यापैकी जर एखाद्यालाही कोरोनाची लागण झालेली असेल तर हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे तिकिटांची विक्री न करता सामने हे बंद स्टेडियममध्ये खेळण्यात यावे असे आयपीएलच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तिकिटांच्या विक्रीने संघांना जवळपास ८ ते १० कोटी रुपये मिळतात. अन्य महसुलाच्या मानाने ही रक्कम फार कमी आहे, त्यामुळे असा निर्णय घेतला जाऊ शकतो असे वृत्त समोर येत आहे.