IPL 2020 : ‘या’ राज्यात IPL सामने होणार नाही, BCCI ला ‘धक्का’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात होताना दिसून येत आहे. देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाय योजना आखल्या जात आहे.

कोरोनामुळे जगभरात आयोजित करण्यात आलेल्या अनेक क्रीडा स्पर्धादेखील रद्द करण्यात येत आहेत. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकही रद्द करण्याचे संकट ओढावले आहे. तसेच भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएललाही कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनामुळे दिल्लीत एकही आयपीएलचा सामना खेळवला जाणार नसल्याचे सांगितले. तसेच दिल्लीतील क्रिडाविश्वाशी संबंधीत सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी राज्यात होणाऱ्या क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण दिल्लीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिले आहे.

15 एप्रिलपर्यंत विदेशी खेळाडूंवर निर्बंध
कोरोना व्हायरसमुळे भारताने व्हिसा बंदी केली आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विदेशी खेळाडू मैदानात दिसणार नाहीत. आयपीएल रिकाम्या स्टेडियममध्ये करण्याची शक्यता असली तरी ही लीग रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 29 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या सामनात्य जवळपास 60 विदेशी खेळाडू मैदानात उतरणार आहेत. बीसीसीआय सुत्रांनी सांगितले की, आयपीएलमध्ये खेळणारे विदेशी खेळाडू बिझनेस व्हिसा श्रेणीत मोडतात. सरकारच्या निर्देशानुसार त्यांना 15 एप्रिलपर्यंत व्हिसा नाकारण्यात आला आहे.