IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, कॅप्टन रोहित शर्मा पडला आजारी, पोलार्डनं दिले अपडेट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवशी दोन सामने सुपर ओव्हरमध्ये रंगले. त्याशिवाय दोन सुपर ओव्हर टाय झाल्याची नोंदही झाली. त्यामुळे सामन्याचा निकाल पुन्हा सुपर ओव्हरमध्ये लागला. या ओव्हरमध्ये पंजाब संघाने बाजी मारली. मयंक आणि गेलच्या तुफान खेळीच्या बळावर पंजाबने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईवर मात केली. मात्र, त्यानंतर मुंबईच्या संघाला अजून एक मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हे पारितोषिक वितरण समारंभास हजर असतात. पण रविवारी सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा पारितोषिक वितरण समारंभास आला नाही. त्याच्या ऐवजी पोलार्ड हा पारितोषिक वितरण समारंभाला आला होता. तेव्हा पोलार्डला रोहित संदर्भात प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, “या सामन्यानंतर रोहित शर्माची तब्येत बिघडली आहे. तो थोडासा आजारी पडला आहे. म्हणूनच मी पारितोषिक वितरण समारंभाला आलो आहे. मात्र, रोहित लवकरच बरा होईल, अशी आम्हा सर्वाना अपेक्षा आहे.”

दोन सुपर ओव्हर नंतर पंजाबचा विजय
कर्णधार लोकेश राहुलच्या (७७) एकाकी झुंजीला सार्थकी लावताना मयांक अग्रवाल आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने किंग्ज इलेव्हन पंजाबला रविवारी आयपीएलमध्ये ऐतिहसिक असा विजय मिळवून दिला. या दोघांच्या सुपर खेळीच्या बळावर पंजाब संघाने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले. तद्वतच पंजाब संघाने लीगमधील आपला सातवा पराभव टाळला.

मुंबईस तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. डिकॉक (५३), कुणाल पंड्या (३४) आणि पोलार्डच्या (३४) तुफानी फटकेबाजीच्या बळावर मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करत पंजाब टीम समोर विजयसाठी १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर पंजाबने सहा गड्यांच्या मोबदल्यात १७६ धावांपर्यंत मजल मारून सामना टाय केला. व दोन वेळा सुपर सामना रंगला. शेवटी यामध्ये पंजाबचा विजय झाला.