कौतुकास्पद ! दुकानात किराणा मालाचा हिशोब सांभाळायचा ‘हा’ व्यक्ती, आता बनलाय IPL चा स्कोरर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या आयपीएल दरम्यान किराणा दुकानात दैनंदिन वेतनावर काम करणारा एक व्यक्ती स्कोअरर म्हणून हजर असेल. तो केवळ पहिल्यांदाच हवाई प्रवास करणार नाही तर आयुष्यात पहिल्यांदाच विमानतळावर पाय ठेवणार आहे. पश्चिम बंगालमधील चिनसुरा (हुगळी) येथील रहिवासी सूर्यकांत पांडासाठी हे एखादे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. एका स्वयंपाक करणाऱ्याचा मुलगा सूर्यकांत केवळ दहावीपर्यंत शिकले आहेत. ते दशकांपूर्वी कामाच्या शोधात ओडिशाहून बंगाल येथे आले होते.

32 वर्षीय सूर्यकांत आयपीएलचे इलेक्ट्रॉनिक स्कोअरर म्हणून पश्चिम बंगालमधून निवडले गेलेले एकमेव व्यक्ती आहेत. त्यांनी नेहमीच क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले, परंतु ओडिशातून पश्चिम बंगालमध्ये गेल्याने त्यांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. ते एका किराणा दुकानात कामाला लागले तर वडील स्वयंपाकी म्हणून काम करत होते. 2002-2003 दरम्यान त्यांनी हुगळी जिल्हा क्रीडा संघटनेच्या मैदानावर काही सामने खेळले, परंतु ते पुढे जाऊ शकले नाहीत. तथापि, सूर्यकांतला नेहमीच क्रिकेटशी जोडले जाण्याची इच्छा होती. या कारणास्तव त्यांनी स्वत:साठी स्कोअरर बनण्याचा मार्ग निवडला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मला क्रिकेटपटू व्हायचे होते, परंतु अनेक कौटुंबिक समस्या माझ्या मार्गात आल्या. मला नेहमी खेळाशी जोडलेले राहण्याची इच्छा होती आणि म्हणूनच मी स्कोअरर बनण्याचा मार्ग निवडला. मी 2015 मध्ये बंगालच्या क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) परीक्षेत सामील झालो आणि उत्तीर्ण देखील झालो.’ आई-वडिलांची छत्रछाया उडाल्यानंतरही त्यांनी किराणा स्टोअरमध्ये काम करता करता क्रिकेटची आवड जोपासली. त्यांनी हुगळी जिल्हा क्रीडा संघात स्कोअरिंग करण्यास सुरवात केली. 2015 मध्ये सीएबी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना स्कोअरर म्हणून निवडण्यात आले आणि त्यानंतर सीएबीने आयोजित केलेल्या बहुतेक सामन्यांचे ते स्कोअरर ठरले.

निरंतर प्रयत्न आणि दृढनिश्चयामुळे सूर्यकांत यांना 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट स्कोअरर म्हणून पुरस्कार मिळाला. सीएबीचे सचिव अविषेक डालमिया यांनी त्यांना पुरस्कृत केले. सूर्यकांत पांडा त्यांच्या सर्व कामांचे श्रेय मेंटर कौशिक साहा आणि रक्तिम साधू यांना देतात. रक्तिम साधू म्हणतात की, ‘ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. त्याला शिकण्यात आणि शिकविण्यात खूप रस आहे. मला त्याच्याकडून खूप आशा आहेत.’

2020 मध्ये आयपीएलचे स्कोअरर म्हणून निवड झाल्यानंतर सूर्यकांत खूप खूश झाले, पण किराणा दुकानातील मालक त्यांना सुट्टी देईल की नाही याची त्यांना भीती होती. मात्र दुकान चालवणाऱ्या विश्वनाथ साधुखान यांनी त्यांचे खूप समर्थन केले. स्वत: विश्वनाथला फुटबॉलपटू व्हायचे होते, परंतु वडिलांच्या आजारपणानंतर त्यांना दुकान व्यवस्थापित करावे लागले. म्हणूनच सूर्यकांतच्या जीवनातील खेळाचे महत्त्व त्यांना समजले. ते म्हणाले, ‘मला फुटबॉलपटू व्हायचे होते, पण तसे झाले नाही. जेव्हा सूर्यकांतने मला सांगितले की तो आयपीएलमध्ये निवडला गेला आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला. मी त्याला माझा कर्मचारी म्हणून कधीच पाहत नाही, तो माझ्यासाठी भाऊ किंवा मित्रासारखा आहे.’

हुगळी जिल्हा क्रीडा असोसिएशनचे सहसचिव विकास मल्लिक म्हणाले, ‘संपूर्ण हुगळी स्पोर्ट्स असोसिएशनला त्यांच्या या कामगिरीचा अभिमान आहे. स्वतःच्या मेहनतीने तो येथे पोहोचला आहे. जेव्हा तो बीसीसीआयची परीक्षा उत्तीर्ण होईल तेव्हा मला अधिक आनंद होईल. त्याला पाहून इतरही लोकांना प्रेरणा मिळू शकेल.’ सूर्यकांत पांडा 19 ऑगस्टला बेंगळुरूला आणि त्यानंतर 27 ऑगस्टला दुबईला उड्डाण करतील. आयपीएल दरम्यान प्रत्येक अनुभवी क्रिकेटपटूंचा स्कोअर आणि संघांची विकेट सूर्यकांतच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्कोअर बोर्डावर दर्शविली जाईल. आयपीएलचे सामने 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळले जातील.

दुबईला पोहोचून सर्वात आधी त्यांना काय करायचे आहे असे विचारले असता ते म्हणाले की, ‘मी स्कोअरिंग सिस्टम व्यवस्थित समजून घेण्यावर भर देईन. मला स्कोअरिंगवर लक्ष केंद्रित करायचं आहे कारण ते माझं काम आहे. सामना संपल्यानंतरच मी खेळाडूंचे ऑटोग्राफ घेण्याचा विचार करू शकतो. सूर्यकांतला आता बीसीसीआय परीक्षा उत्तीर्ण करून हे काम राष्ट्रीय संघांसाठी करायचे आहे.