IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन प्रीमियर लीग 2021 चा थरार 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पहिला सामना रंगणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने बीसीसीआयने आयपीएल 2021 साठी सहा स्टेडियम्सची निवड केली आहे. यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा समावेश आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

या ठिकाणी होणार सामने

आयपीएल 2021 चे सामने अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि कोलकात्यात होणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 25 मे , 26 मे आणि 28 मे रोजी प्ले-ऑफचे सामने होणार आहेत, तर 30 मे रोजी याच मैदानावर आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या हवाल्याने दिले आहे.

प्रत्येक संघ 4 ठिकाणी खेळणार

आयपीएल 2021 च्या यंदाच्या मोसमात प्रत्येक संघ 4 ठिकाणी खेळणार आहे. यापैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये प्रत्येकी 10 मॅच होणार आहेत, तर अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये 8 सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक सामने हे न्यूट्रल ठिकाणी म्हणजेच कोणत्याच टीमच्या घरच्या मैदानात खेळवले जाणार नाहीत. प्रत्येक टीम लीग स्टेजमध्ये 6 पैकी 4 ठिकाणी खेळणार आहे.

यंदाच्या हंगामात 11 मॅच डबल हेडर असतील

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 11 मॅच डबल हेडर असणार आहेत. म्हणजे एका दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, तर दुसरा सामना रात्री 7.30 वाजता सुरू होईल. प्रत्येक टीमला लीग स्टेजमध्ये फक्त तीन वेळाच प्रवास करावा लागणार आहे, अशा पद्धतीने यंदाच्या हंगामाचे वेळापत्रक बनवण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.