IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेल अन् ख्रिस मॉरिसबद्दल गावस्करांचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPL च्या लिलावात सर्वाधिक महागडया ठरलेल्या ख्रिस मॉरिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन्ही खेळाडूंबद्दल भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी मोठे विधान केले आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. गावस्कर म्हणाले की, आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंना IPL मध्ये संघर्ष करावा लागत आहे. खासकरून भारताच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना काही समस्या जाणवतात. पण असे असले तरी ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस मॉरिस यांनी चांगली सुरुवात केली आहे. माझ्यामते या संपूर्ण IPL मध्ये त्यांच्याकडून नेत्रदीपक कामगिरी होऊ शकते असे ते म्हणाले.

मुंबई इंडियन्सच्या सामन्यात बरेच षटकार आपल्याला दिसून आले. कारण त्यावेळी चेंडू हा बॅटवर सहजपणे येत होता. तसेच चेंडूंमध्ये चांगली उसळीही दिसून आली. चेन्नईच्या खेळपट्टीबाबत बोलायचे झाले, तर येथे भारताविरुद्धच्या 2 कसोटी खेळवल्या होत्या. त्यामुळे कदाचित खेळपट्टी बनवण्यासाठी जास्त वेळ मिळाला नसेल. पण दुसरीकडे वानखेडेच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगला फायदा मिळत असल्याचे दिसून आले. कारण वानखेडेच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी विकेट्स मिळवल्या आहेत. पण दुसरीकडे चेन्नईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना चांगली साथ मिळत असल्याचे दिसले. पण जे गोलंदाज चतुर असतात त्यांना गोलंदाजी कशी करायची याची चांगली माहिती असते. त्यामुळे एक चांगला चेंडू फलंदाजाचा मोठा फटका बिघडवू शकतो, असे गावस्कर म्हणाले. वानखेडेच्या खेळपट्टीवर चांगली उसळी मिळते, याचा फायदा पंजाब किंग्सच्या मेरेडिथने घेतल्याचे दिसले. कारण चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने बाऊन्सर्सच्या जोरावर अंबाती रायुडू आणि सुरेश रैना यांना बाद केले. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जेवढे चेंडू निर्धाव जातात. तेवढे फलंदाजावर दडपण वाढते. निर्धाव चेंडू गेल्यावर फलंदाज मोठे फटके मारण्याची जोखीम उचलत असल्याचे गावस्कर म्हणाले.