IPL 2021 : लिलावात 1097 खेळाडूंवर लागणार बोली; जो रुट, मिचेल स्टार्कची माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पेर्धेच्या 2021 च्या हंगामासाठी 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. लिलाव प्रक्रियेला दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार आहे. प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येते. लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी (दि.4) संपली आहे. आयपीएल लिलावासाठी तब्बल 1097 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. यामध्ये 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

लिलावात 207 आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू उपलब्ध असून यामध्ये 21 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच 863 बिगर आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मोठा भरणा असून, यात 743 भारतीय व 68 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. लिलावात वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक 56 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाचे 42 आणि दक्षिण आफ्रिकेचे 38 खेळाडू उपलब्ध आहे. संलग्न राष्ट्रांच्याही 27 खेळाडूंची यामध्ये नोंद आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रुटची माघार

इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे. काही दिग्गज खेळाडूही लिलावाच्या मैदानात उतरले आहे. यापैकी काही खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे.

दोन कोटी किंमत असणारे खेळाडू

केदार जाधव, हरभजन सिंह, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क बुडे, कॉलिन इन्ग्राम, अ‍ॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस.

कोणत्या संघाकडे किती रक्कम ?

किंग्ज एलेव्हन पंजाब संघाकडे लिलावात सर्वाधिक 53.20 कोटी रुपये आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे 35.90 कोटी, राजस्थान रॉयल्स 34.35 कोटी, चेन्नई सुपर किंग्स 22.90 कोटी, मुंबई इंडियन्स 15.35 कोटी, दिल्ली कॅपिटल्स 12.9 कोटी आणि कोलकता व हैदराबाद प्रत्येकी 10.75 कोटी रुपयांसह लिलावात उतरतील. स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या अव्वल ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रिटेन्शनच्या अखेरच्या दिवशी अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने बाहेरचा रस्ता दाखवला. एकूण 139 खेळाडू फ्रँचायझींनी कायम ठेवले आणि 57 खेळाडूंना रिलीज केले.