IPL 2021 : BCCI पुढे पेच ! कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएल थांबवावे म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. बाधितांची संख्या वाढत आहे. लोकांना आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे. अशी एकूण बिकट परिस्थिती असताना इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरु आहे. त्यामुळे वकील करण सिंग ठुकराल आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन सिंग यांनी आयपीएल स्पर्धा तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, जनतेच्या आरोग्या पेक्षाही आयपीएलला जास्त महत्व का दिलं जातंय याची चौकशी करण्याचीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेमुळे आता बीसीसीआय पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएल स्थगित करण्याची मागणी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनीही काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयात आयपीएल स्थगित करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत बीसीसीआय, दिल्ली क्रिकेट असोसिएशन, तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता स्टेडियमचा उपयोग कोरोनाग्रस्तांसाठी करण्यात यावा अशीही विनंती करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.